महाराष्ट्रात दिवसभरात मुसळधार पाऊस; अचानक पाऊस बरसल्याने जनजीवन विस्कळीत

Rohit Shinde

महाराष्ट्रावरील पावसाचे संकट 29 ऑक्टोबरपर्यंत कायम राहिल असा अंदाज हवामान विभागाकडून या पूर्वीच वर्तविण्यात आला आहे. अशा परिस्थितीत अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र आणि पूर्व किनाऱ्यावरील मोंथा चक्रीवादळ यामुळे महाराष्ट्राच्या अनेक भागात पाऊस बरसत आहेत. आज दिवसभरात राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस बरसला.

आज कुठे-कुठे पाऊस बरसला?

आज दिवसभर मुंबई आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण होतं, त्यानंतर मुंबईच्या काही भागांमध्ये पावसानं हजेरी लावली, अचानक आलेल्या पावसामुळे नोकरदार वर्गाची चांगलीच तारांबळ उडाल्याचं पहायला मिळालं. मुंबई उपनगरातील, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव आणि अंधेरी भागात काही वेळ जोरदार पाऊस झाला.  मीरा -भाईंदरमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. दुपारपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला आहे. जळगाव शहरात आज दिवसभर ऊन सावलीचा खेळ पाहायला मिळाला, मात्र सायंकाळी साडेसातच्या सुमारास अचानक जोरदार पावसानं हजेरी लावली.  जळगाव तालुक्यासह अनेक भागात झालेल्या या पावसाचा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

नंदूरबार जिल्ह्यात देखील आज जोरदार पावसानं हजेरी लावली आहे.  नंदुरबार जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस झाला, या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे.

पावसामुळे शेतातील पिकांची हानी

पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.  एकीकडे  पिकांना भाव नाही  तर दुसरीकडे पावसामुळे पिकांचे नुकसान सुरू आहे, त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अनेक भागात झालेल्या या पावसाचा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.  गेल्या 24 तासांमध्या राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे, या पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे.

पुढील 48 तासात मुसळधार बरसणार!

राज्यभरात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पावसाने धुमाकुळ घातला आहे. कोकण, मध्य-महाराष्ट्र, मराठवाडा ते विदर्भ सर्वत्र पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण असून हवेतील आर्द्रता वाढली आहे. काढणीला आलेली पिकं पाण्यात भिजत असल्याने शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा नुकसान होत आहे. दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन ते तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार आहे. आज मुंबई पुण्यासह बहुतांश महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट आहे.

आता पुढील दोन दिवस पुण्यासह राज्यातील इतर भागांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुढील 48 तासांसाठी मुंबईसह उपनगरांना वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. मोंथा चक्रीवादळाचा पूर्व किनारपट्टीवरील प्रभाव आणि अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र यामुळे पावसाची स्थिती आणखी तीन दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

ताज्या बातम्या