महाराष्ट्रातील काही भागात आता पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागांतील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच, उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता वर्तवली आहे. 8 ऑगस्ट रोजी राज्यातील हवामानाची स्थिती नेमकी कशी असेल, हवामान विभागाने पावसाबाबत नेमका काय अंदाज वर्तवला ते सविसस्तर जाणून घेऊ…
मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश प्रामुख्याने ढगांनी आच्छादलेले राहण्याची शक्यता आहे. तसेच काही भागांमध्ये हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काही निवडक भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबईमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर व त्याच्या घाटमाथ्यावर जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून, ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट घोषित केला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. तर धुळे, नंदुरबार आणि जळगाव या भागांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मराठवाडा-विदर्भासाठी हवामान विभागाचा अलर्ट
मराठवाड्यातील सर्व आठ जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जाहीर केला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड आणि धाराशिव या भागांमध्ये वीज चमकल्यासह जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर बीड जिल्ह्यात काही निवडक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भातील वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट घोषित केला आहे. पश्चिम विदर्भात आकाश प्रामुख्याने ढगाळ राहण्याची शक्यता असून, काही निवडक भागांत किरकोळ पावसाच्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे एकंदरीत कमी-अधिक फरकाने राज्याच्या सर्वच भागात चांगल्या पावसाचा अंदाज आहे.





