महाराष्ट्राच्या बहुतांश भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. सोलापूर, लातूर, धाराशिव, जालना, परभणी, दक्षिण नगर हे भाग आहेत, या सगळ्याठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मराठवाड्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसल्याचे चित्र सद्यस्थितीला आहे. त्यामुळे या भागांत शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. पशूधनाचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकांनी नागरिकांनी जीव गमावला आहे. एकूणच गंभीर स्थिती निर्माण झालेली आहे.
मराठवाड्यातील जिल्ह्यांत पावसाचा हाहाकार
धाराशिव जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस पडला. गेल्या दोन दिवसांच्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. धाराशिवच्या भूम परंडासह कळंब परिसरातही रात्री जोरदार पाऊस झाला. पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून अनेक रस्ते बंद असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात देखील परिस्थिती गंभीर आहे. बीड, अहिल्यानगर अद्याप पुरस्थितीतून सावरलेले नाहीत. या संपूर्ण परिस्थितीत शेतकरी आणि नागरिक सरकारचा आधार मिळावा, अशी मागणी करत आहे.

ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचाली
मराठवाड्यासह राज्यातील अन्य भागांमध्ये गेल्या दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्य सरकारकडून ओला दुष्काळ जाहीर केला जाण्याची दाट शक्यता आहे. सरकारी पातळीवर त्यादृष्टीने हालचालींना वेग आला आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक असून यावेळी सर्व मंत्र्यांकडून एकमुखाने ओला दुष्काळा जाहीर करण्याचा प्रस्ताव मांडला जाऊ शकतो. तत्पूर्वी राज्याचे कृषीमंत्री दत्ता भरणे आणि मदत व पुनवर्सन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण संकेत दिले. दोन्ही मंत्र्यांनी राज्य सरकारकडून ओला दुष्काळ जाहीर होऊ शकतो, असे संकेत दिले.
राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री परिस्थितीवर सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री हे संबंधित भागातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठं नुकसान झाले आहे. शेती, घरांची पडझड आणि नुकसान झाले आहे.
शरद पवारांचे सरकारला काय आवाहन?
सोलापूर, धाराशिव, परभणी, नांदेड, बीड या सगळ्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. असे संकट येतं तेव्हा त्यांना मदत करण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता केंद्र सरकारकडून राज्याला मदत करण्यासाठी ज्या योजना आहेत त्या वापरून नुकसानभरपाई करणे गरजेचे आहे. जमीन वाहून गेलं, पिक गेलं, माती गेली या तिन्ही गोष्टींची नुकसान भरपाई दिली पाहिजे असे पवार म्हणाले.











