पुण्यातील ‘या’ रस्त्यांवर अवजड वाहनांना बंदी; वाहतूक कोंडीच्या नियमनासाठी महत्वाचा निर्णय

Rohit Shinde
दिवाळीच्या काळात पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होते. सणासुदीच्या खरेदीसाठी लोक बाजारपेठांकडे गर्दी करतात, ज्यामुळे मुख्य रस्त्यांवर वाहतुकीचा ताण वाढतो. पार्किंगची कमतरता आणि रस्त्यावरील फेरीवाले यामुळे परिस्थिती अधिक बिकट होते. पोलिस प्रशासन विशेष वाहतूक नियंत्रण योजना राबवते, परंतु वाहनांची वाढती संख्या आणि नागरिकांचा संयमाचा अभाव यामुळे कोंडी कमी होणे कठीण जाते. त्यामुळे दिवाळीच्या काळात पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे.


शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

कात्रज बाह्यवळण मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. शहरातील वाढत्या गर्दीमुळे आणि वाहतुकीच्या ताणामुळे या मार्गांवर अवजड वाहनांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. कात्रज ते किवळे आणि किवळे ते कात्रज या मार्गांवर ठराविक वेळेत जड वाहनांना बंदी घालण्यात आली असून यामुळे शहरातील ट्रॅफिकचा ताण कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दिवाळीपूर्वी होणारी वाढती गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.

 15 ऑक्टोबरपासून सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत कात्रजकडून किवळेकडे जाणाऱ्या मार्गिकेवर तसेच सायंकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत किवळे ते कात्रजकडे जाणाऱ्या मार्गिकेवर अवजड वाहनांना प्रवेश बंदी असेल. हे निर्बंध पुढील आदेश येईपर्यंत कायम राहतील. या कालावधीत वाहतूक पोलिस आणि प्रशासन मिळून या निर्णयाची अंमलबजावणी करतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
याशिवाय पुणे-बेंगळुरू महामार्ग क्रमांक 48, तसेच जुना मुंबई-पुणे महामार्ग क्रमांक 4 यावरही या बंदीचा परिणाम होणार आहे. सातारा, सांगली आणि कोल्हापूरकडून येणारी वाहने शिंदेवाडी टोलनाक्याच्या पुढे येऊ शकणार नाहीत, तर ठाणे, रायगड आणि नवी मुंबईकडून येणाऱ्या वाहनांना उर्से टोलनाक्याच्या पुढे येण्यास बंदी असेल. मात्र, अत्यावश्यक सेवेतील वाहने आणि शहरात प्रवेश आवश्यक असणाऱ्या वाहनांना या नियमातून सूट देण्यात आली आहे.
11 ऑक्टोबरपासून भिडे पूल वाहतुकीसाठी सुरू करण्याची मागणी केली आहे. या पुलावर मेट्रोचे काम सुरू असल्याने तो एप्रिलपासून बंद आहे. जूनपर्यंत आणि नंतर 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देऊनही काम पूर्ण झालेले नाही, यामुळे लोकांमध्ये नाराजी वाढत आहे.

दिवाळीत वाहतूक सुरळीत राहणार ?

वाहतूक पोलिस आणि प्रशासनासमोर सध्या दुहेरी आव्हान आहे. एकीकडे वाढती वाहतूक आणि दुसरीकडे नागरिकांचा दिवाळीपूर्वीचा खरेदीचा ओघ. त्यामुळे कात्रज-किवळे मार्गावरील बंदीमुळे शहरातील वाहतूक सुसूत्र होईल, अशी अपेक्षा आहे. तसेच भिडे पूल लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी पूर्ण झाल्यास गर्दीचा ताणही लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो. त्यामुळे या निर्णयाचा कसा फायदा होतो ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ताज्या बातम्या