पुरामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिके वाहून गेली, जनावरे मृत्युमुखी पडली आणि शेतीचे साधनसामग्री नष्ट झाली. अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत. सरकारकडून तात्काळ मदत मिळावी आणि पुनर्वसनाच्या उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी होत आहे. अशा या परिस्थितीत सरकारकडून मोठा कोणताही ठोस प्रतिसाद मिळताना दिसत नाही. अशा परिस्थितीत मनोज जरांगे पाटलांनी मात्र आपण शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ऐतिहासिक आंदोलन उभारणार असल्याची घोषणा केली आहे.
शेतकऱ्यांसाठी मोठं आंदोलन उभारणार -जरांगे
मराठा आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील यांनी रान पेटवले. मराठा-कुणबी आंदोलनाबाबत हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट लागू करण्याचा निर्णय झाला आहे. आता जरांगे पाटील हे शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरले आहेत. राज्यातील 29 जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपले आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. शेताना तळ्याचं स्वरूप आलं. नदी-ओढ्याकाठच्या जमिनी वाहून गेल्या. शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं. पण मदतीचा मोठा हात अद्यापही शेतकऱ्यांपर्यंत पोहचला नाही. 3 हजारांहून अधिक कोटींच्या पॅकेजची घोषणा झाली. पण दिवाळी संपूनही शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्याविरोधात जरांगे पाटील यांनी भाऊबीजेलाच आंदोलनाचा नांगर टाकला आहे.

ऐतिहासिक आंदोलनाचे अंतरवालीत नियोजन होणार
.लवकरच बैठक घेऊन शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन उभारणार आहे. अनेक ठिकाणी सरकार पेक्षा अधिकारी मोठे झाले आहेत. जे अधिकारी काम करत नाही त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत. दिलेली मदत ही मदत म्हणता येणार नाही. तो तात्पुरता आनंद आहे. जसं की फडणवीस हे प्रत्येकाला तात्पुरता आनंद देतात. धनगर समाजाला देखील तात्पुरता आनंद दिला. शेतकऱ्याचे काम करणारे अभ्यासक, तज्ञ, नेते एकत्र बसू. सगळ्यांना फोन करून बोलावणार आहे असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.
राज्यातील लाखो शेतकरी मदतीपासून वंचित
राज्यातील अनेक शेतकरी आजही सरकारी मदतीपासून वंचित आहेत. पूर, दुष्काळ आणि पिकांच्या नुकसानीनंतरही अनेकांना भरपाई मिळालेली नाही. अर्ज प्रक्रिया गुंतागुंतीची असून प्रशासनाकडून प्रतिसाद कमी आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत, कर्जमाफी आणि पुनर्वसनाच्या ठोस उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.