उन्हाळा संपताना तसेच पावसाळ्याच्या काळात डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांचे प्रमाण वाढते. डासांच्या उत्पत्तीला या काळात पोषक वातावरण तयार होत असल्याने या काळात हे आजार उद्भवतात. पावसामुळे शहरात तसेच ग्रामीण भागातही ठिकठिकाणी पाणी साचते आणि डासांच्या प्रजननासाठी अनुकूल वातावरण तयार होते. विशेषतः एडीस डास डेंग्यूचा तर अॅनोफिलीस डास मलेरियाचा प्रसार करतात. पाणी साचलेल्या जागा, नाले, गटारे आणि उघडी भांडी ही डासांची मुख्य उत्पत्तीस्थाने ठरतात. राज्यातील डेंग्यूच्या रूग्णांबाबत काहीसा धक्का देणारा असा आकडा आता समोर आला आहे.
राज्यात सप्टेंबर अखेरीस 9,728 रूग्ण
राज्यात सप्टेंबर अखेरीस डेंग्यूचे 9728 रुग्ण आढळले. मुंबईमध्ये रुग्णांचा आकडा सर्वाधिक आहे, मात्र मृत्यूची संख्या घटल्याने दिलासा मिळाला आहे. असे असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत रुग्णसंख्येत वाढ झालेली दिसून आली. राज्यातील डेंग्यू तापाचा फैलाव वाढत असून यावर्षी सप्टेंबर अखेरीस हजारो रुग्ण आढळले. गेल्या वर्षीच्या तुलनेत रुग्णसंखेत वाढ झाली असून आरोग्य विभागाने डेंग्यू नियंत्रण मोहिमेला गती दिली आहे.

जनजागृती आणि उपाययोजना सुरू
मॉन्सून तुलनेने शांत झाला आहे. मात्र, बुडालेले भाग आणि साचलेले पाणी डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांसाठी कारणीभूत ठरत आहेत. येत्या दिवसांत लेप्टोस्पायरोसिस सारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतोय. त्यामुळे बीएमसीने झोपडपट्ट्यांमध्ये फोगिंग, सॅनिटायझेशन आणि घराघरांमध्ये औषध वितरणाची मोहीम युद्धस्तरीय सुरू केली आहे. मुंबईत डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड यांसारख्या आजारांचे रुग्ण वाढतात. गेल्या पावसामुळे रुग्णसंख्या अचानक वाढल्याने बीएमसीच्या रुग्णालयांमध्ये मानसून वॉर्ड्स उभारण्यात आले आहेत.