गणेशोत्सवाच्या काळात एसटी महामंडळ मालामाल; 10 दिवसांत इतके कोटी कमावले!

गणेशोत्सवाच्या काळात एसटीच्या उत्पन्नात देखील मोठी भर पडल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रवासातून एसटी महामंडळाला तब्बल २३.७७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

महाराष्ट्रातील दळणवळण व्यवस्थेत एसटी बसेसचे महत्व अतुलनीय आहे. ग्रामीण, दुर्गम व आदिवासी भागांना शहरांशी जोडण्याचे मोठे काम एसटी करते. स्वस्त, सुरक्षित व विश्वासार्ह प्रवासाची सुविधा एसटीमुळे सामान्य माणसाला मिळते. शेतकरी, विद्यार्थी, कामगार आणि प्रवासी यांना दैनंदिन प्रवासासाठी एसटी हा मुख्य आधार आहे. आपत्तीच्या काळात, निवडणुका किंवा इतर तातडीच्या प्रसंगीही एसटी महत्त्वाची भूमिका बजावते. खरंतर महाराष्ट्रातील गणेशोत्सवाच्या काळात देखील एसटीची भूमिका तितकीच महत्वाची असते. यंदा गणेशोत्सवाच्या काळात एसटीच्या उत्पन्नात देखील मोठी वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

गणेशोत्सवामुळे एसटीला अच्छे दिन!

गणपती उत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर येथून सुमारे ५ लाख ९६ हजार कोकणवासीयांनी एसटी बसने आपल्या गावी सुरक्षित प्रवास केला, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.  यामुळे एसटीच्या उत्पन्नात देखील मोठी भर पडल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रवासातून एसटी महामंडळाला तब्बल २३.७७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

गणेशोत्सवाच्या काळात कोकणात येणाऱ्या लाखो प्रवाशांची सोय करण्यासाठी एसटी महामंडळाने विशेष नियोजन केले होते. यंदा, कोकणवासीयांसाठी ५,००० जादा एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत, या बसेसने १५,३८८ फेऱ्यांद्वारे ५ लाख ९६ हजार प्रवाशांना सुरक्षितपणे त्यांच्या गावी पोहोचवले. विशेष म्हणजे, इतक्या मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वाहतूक करताना कोणताही अपघात झाला नाही, हा एक नवा विक्रमच आहे.

एसटी महामंडळाला मोठा दिलासा

महाराष्ट्राची सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक घडामोडी वेगाने पुढे नेण्यात एसटीचा हातभार आहे. त्यामुळे एसटी ही केवळ वाहतूक व्यवस्था नसून महाराष्ट्रातील लोकजीवनाला जोडणारी जीवनवाहिनी आहे. परंतू, आर्थिक चणचणीमुळे ही एसटी डबघाईला आल्याचे आपण ऐकतो. त्यामध्ये आता काहीशी सुधारणा होताना दिसत आहे. गणेशोत्सवाच्या काळात या प्रचंड वाहतुकीची यशस्वी व्यवस्थापन करण्यासाठी एसटी प्रशासनाने अथक परिश्रम घेतले. राज्यभरातील १०,००० हून अधिक चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी आणि पर्यवेक्षक-अधिकाऱ्यांनी या कामात मोलाची भूमिका बजावली. प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी बसस्थानकांवर आणि बस थांब्यांवरही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत होते. त्यामुळे लालपरी चालविणाऱ्या महामंडळाला यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News