MP Breaking News
Wed, Dec 17, 2025

6 फुटांपर्यंतच्या मुर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन बंधनकारक; पीओपी मुर्तींसाठी मार्गदर्शक सूचना जारी!

Written by:Rohit Shinde
Published:
6 फुटांपेक्षा कमी उंचीच्या पीओपी मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात करणे बंधनकारक आहे. या सूचनांची अंमलबजावणी मार्च 2026 पर्यंत साजऱ्या होणाऱ्या सर्व सण-उत्सवांवर लागू असेल.
6 फुटांपर्यंतच्या मुर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन बंधनकारक; पीओपी मुर्तींसाठी मार्गदर्शक सूचना जारी!

२०२५ चा गणेश उत्सव अगदी तोंडावर आलेला आहे. अशा परिस्थितीत प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. असं असताना राज्य शासनाने पीओपी मुर्ती आणि मोठ्या 6 फुटांपेक्षा मोठ्या मुर्ती तलावात, समुद्रात विसर्जन करण्यास नकार दिला होता. मात्र त्यानंतर आता पर्यावरणपूरक सण साजरे करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजेच पीओपी मूर्ती विसर्जनासंदर्भातील काही विशेष मार्गदर्शक सूचना शुक्रवारी जारी केल्या आहेत.

शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

6 फुटांपेक्षा कमी उंचीच्या पीओपी मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात करणे बंधनकारक आहे. या सूचनांची अंमलबजावणी मार्च 2026 पर्यंत साजऱ्या होणाऱ्या सर्व सण-उत्सवांवर लागू असेल. पीओपी मूर्तीची विक्री करताना नोंदवही ठेवणे बंधनकारक असणार आहे. मूर्ती विक्रेत्याने ग्राहकाला विसर्जनाची माहितीपत्रिका देणे बंधनकारक असणार आहे. शिवाय पीओपी मूर्तीच्या मागे ऑइल पेंटने लाल रंगाचे गोलाकार चिन्ह असणे बंधनकारक असणार आहे. गणेश मंडळांना लहान आकाराच्या मूर्ती बसवण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे देखील शासनाने म्हटले आहे.

6 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या सार्वजनिक मूर्तीना कोणताही पर्याय उपलब्ध नसेल, तर नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करण्याची परवानगी दिली जाऊ शकते.स्थानिक स्वराज्य संस्थांनी मूर्ती विसर्जनासाठी योग्य आकाराचे आणि पुरेशा संख्येने कृत्रिम तलाव तयार करावे.तलावातील पाणी मूर्तीच्या अपेक्षित क्षमतेच्या 8-10 पट असावे. अशा काही मार्गदर्शक सूचना शासनाने जारी केल्या आहेत.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव काळाची गरज

पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही आजच्या काळाची अत्यंत गरज आहे. पारंपरिक गणपती मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिस आणि रासायनिक रंगांपासून बनवल्या जातात, ज्यामुळे जलप्रदूषण होते आणि जलचरांच्या जीवितास धोका निर्माण होतो. यासाठी शाडू मातीच्या मूर्ती, नैसर्गिक रंगांचा वापर, आणि घरगुती विसर्जनास प्राधान्य देणे आवश्यक आहे. फुलं, फळं आणि कागदी सजावटीने उत्सव साजरा केल्यास पर्यावरणाचे रक्षण होऊ शकते. तसेच ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी डीजे, मोठ्या फटाक्यांचा वापर टाळावा. गणेशोत्सव हे श्रद्धेचे प्रतीक असून तो निसर्गाची हानी न करता साजरा केला गेला पाहिजे. पर्यावरणाची काळजी घेणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.