महिला, तरूणी आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामध्ये जवळच्या नात्यातील नागरिकांकडूनच अनेकदा घात केला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. मुंबईत अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. पैशासाठी रक्ताच्या नात्याचा सौदा करण्यात आला आहे. मामा-मामीनं आपल्या अल्पवयीन भाचीला अवघ्या 90 हजारांसाठी विकल्याची घटना समोर आली आहे. वाकोला येथे ही घटना घडली आहे.
मामाने भाचीला 90 हजारांना विकलं !
मुंबईतील वाकोला परिसरात पाच वर्षांच्या मुलीचं अपहरण करून तिच्या स्वतः च्या मामा आणि मामीनं तिला फक्त 90 हजार रुपयांत विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाने संपूर्ण मुंबई हादरली असून पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. अजून काही आरोपी उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वाकोला परिसरात राहाणारी पाच वर्षांची चिमुरडी 22 नोव्हेंबर रोजी घराजवळून अचानक बेपत्ता झाली होती. मुलगी लहान असल्याने पोलिसांनी त्वरित अपहरणाचा गुन्हा दाखल केला. प्रकरण गंभीर स्वरूपाचे असल्याने पोलिस उपायुक्त मनीष कलवानिया यांनी सात पोलिस पथकं तयार केली आणि तपासाची चक्रं वेगाने फिरू लागली.
कसा झाला गुन्ह्याचा उलगडा ?
दोन दिवस सलग तांत्रिक तपास आणि गुप्त माहिती यांच्या आधारे पोलिसांना एका संशयित रिक्षेचं वर्णन मिळालं. ती रिक्षा सांताक्रूझहून पनवेलला गेल्याचंही समोर आलं. क्रमांक नसतानाही फक्त वर्णनावरून पोलिसांनी रिक्षाचालक लतीफ अब्दुल माजिद शेख याला शोधून काढलं. चिमुकलीचं अपहरण तिच्याच मामा लॉरेन्स निकलेस फर्नांडिस आणि मामी मंगल यांनी केल्याचं उघड झालं.
पनवेलमध्ये राहणाऱ्या लॉरेन्स आणि मंगल यांना अटक करून कसून चौकशी केली असता त्यांनी चिमुकलीला ओळखीतल्या करण मारुती सणस या तरुणाला 90 हजार रुपयांना विकल्याची कबुली दिली. करनच्या चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर आली. त्याने रूपाला वृंदा विनेश चव्हाण आणि अंजली अजित कोरगावकर या दोन महिलांना तब्बल 1 लाख 90 हजार रुपयांना पुन्हा विकल्याचं सांगितलं.
पोलिसांनी तत्काळ छापा टाकून वृंदाला अटक केली आणि तिच्या तावडीतून रूपाची सुखरूप सुटका केली. तिला परत सांताक्रूझ येथील घरी आणून आईच्या स्वाधीन करण्यात आलं. पोलिसांनी लॉरेन्स निकलेस फर्नांडिस (मामा), मंगल फर्नांडिस (मामी), लतीफ शेख (रिक्षाचालक), करण मारुती सणस आणि वृंदा विनेश चव्हाण या पाच आरोपींना अटक केली आहे.
अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचं काय?
अल्पवयीन मुलींची सुरक्षितता हा आजच्या समाजातील अत्यंत गंभीर आणि संवेदनशील मुद्दा आहे. वाढते गुन्हे, मानव तस्करी, ऑनलाइन शोषण आणि कुटुंबातील अत्याचार यामुळे मुलींचं संरक्षण अधिक मजबूत करण्याची गरज आहे. पालकांनी मुलींशी खुली संवाद साधणे, त्यांना स्वसंरक्षणाचे मूलभूत प्रशिक्षण देणे आणि त्यांच्या हालचाली व ऑनलाइन क्रियाकलापांवर योग्य पाळत ठेवणे आवश्यक आहे.
शाळा आणि समाज संस्थांनी सुरक्षितता व जागरूकता कार्यक्रम राबवले पाहिजेत. कायदा अंमलबजावणी यंत्रणा, तत्पर पोलिस कारवाई आणि कठोर कायदे हेही तितकेच महत्त्वाचे आहेत. एकत्रित प्रयत्नांनीच अल्पवयीन मुलींसाठी सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण निर्माण होऊ शकते.