मराठवाड्यात पावसामुळे सर्वाधिक नुकसान झालं आहे. मराठवाड्यातील नदी नाले दुथड्या भरून वाहत आहेत. नद्यांना पूर आल्यानं पुराचं पाणी गावात शिरल्याचं चित्र आहे, काही ठिकाणी गावाला पुराचा वेढा पडल्यानं नागरिक गावात अडकले आहेत. पूरग्रस्तांना सरकारकडून तसेच संघटना, ट्रस्ट यांच्याकडून मदत केली जात असताना, राज्यात झालेल्या अतीवृष्टी आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तातडीने महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याबाबत यावे, अशी मागणी काँग्रेस नेते तथा आमदार विजय वडेट्टीवारांची पत्राद्ववारे राज्यपालांकडे केली आहे. याबाबत त्यांनी राज्यपालांना पत्र लिहिले आहे.
पत्रात काय म्हटलंय?
दरम्यान, राज्यात तब्बल ४ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील उभी पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक ठिकाणी शेतजमिनी वाहून गेल्या (खरवडून गेल्या) आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांचे आयुष्यभराचे श्रम मातीमोल झाले आहेत. या हंगामात ५ टक्के देखील उत्पादन हाती येण्याची शक्यता नाही. पूरपरिस्थितीत अनेक जनावरे वाहून गेली, घरे कोसळली आणि दुर्दैवाने जीवितहानी देखील झाली आहे. वीजपुरवठा खंडित: विजेचे खांब व तारा कोसळल्याने अनेक ठिकाणी वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. गाव आणि शहरांना जोडणारे महत्त्वाचे रस्ते खचल्याने वाहतूक आणि दळणवळण व्यवस्था पूर्णपणे खंडित झाली आहे.

तसेच पिण्याचे पाणी दूषित झाल्याने सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या गंभीर संकटातून राज्याला बाहेर काढण्यासाठी तातडीने ठोस धोरणात्मक निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे.
ओला दुष्काळ जाहीर करावा
मी आपले लक्ष महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र यांसह अनेक भागांमध्ये झालेल्या विक्राळ अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे निर्माण झालेल्या अत्यंत गंभीर परिस्थितीकडे वेधू इच्छितो. या अभूतपूर्व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिक पूर्णपणे संकटात सापडले असून त्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळं ओला दुष्काळ जाहीर करावा, राज्यात तातडीने ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून बाधित शेतकरी, कामगार आणि सामान्य नागरिकांसाठी सरसकट, भरीव आर्थिक मदत आणि पुनर्वसन पॅकेज जाहीर करावे.
कर्जमाफी आणि नुकसानभरपाई
नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याच्या (कर्जमाफी) आपल्या आश्वासनाची पूर्तता करण्याची हीच योग्य वेळ आहे. तसेच, पिकांचे आणि मालमत्तेचे योग्य मूल्यमापन करून तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असल्यामुळे, या तातडीच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यासाठी, तसेच जनतेला दिलासा देणारे ठोस धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी, महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन त्वरित बोलावण्याचा आपण सरकारला आग्रह करावा, ही नम्र विनंती. आपण या जनहिताच्या मागणीवर तात्काळ आणि सकारात्मक कार्यवाही कराल, असा विश्वास व्यक्त करतो. असं पत्रात वडेट्टीवारांनी म्हटलंय.











