महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर होईल, अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र, सरकार सत्तेत आल्यानंतर कर्जमाफीचा हा मुद्दा मागे पडला. शेतकऱ्यांमधून मात्र सातत्याने याबाबत प्रश्न विचारला जात होता. अशा परिस्थितीत कृषिमंत्रीपदाची माळ दत्तात्रय भरणेंच्या गळ्यात पडल्यावर कर्जमाफीबाबत सातत्याने सवाल उपस्थित होताना दिसत आहे. मात्र, यावर मंत्र्यांकडून सातत्याने सावध उत्तर दिले जात आहे. यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील कर्जमाफी लवकर न मिळण्याचे संकेत दिले होते.
मंत्री भरणे कर्जमाफीवर काय म्हणाले?
कर्जमाफीच्या प्रश्नावर बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले की, “मी शेतकरी पुत्रच आहे. माझा जन्म देखील शेतकरी कुटुंबातच झाला आहे. आज मी उठल्यावर मला शेती दिसते आणि झोपताना देखील शेती दिसते. त्यामुळे, शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहेत, या माझ्यासारख्याला कार्यकर्त्याला एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून माहिती आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीची जाण मला आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात योग्यवेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे निर्णय घेतील,” असं भरणे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे भरणेंनी हा चेंडू ज्येष्ठांच्या कोर्टात टोलवला आहे. त्यामुळे कर्जमाफीचे घोंगडे भिजतेच राहण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
मुसळधार पावसामुळे धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतीचं आणि घरांचं नुकसान झालं आहे. या नुकसानीची दखल घेत राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे हे आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आणि वाशी तालुक्यातील घोडकी गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. यानंतर, कृषीमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे स्पष्ट आदेश दिले .
शेतकरी कर्जमाफी मिळणार का?
कृषिमंत्रीपदाची घोषणा झाली त्यावेळी मंत्री दत्ता भरणेंना शेतकरी कर्जमाफीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी यावर अत्यंत सावध असे उत्तर दिले होते. “अजून मी चार्ज घेतलेला नाही. संपूर्ण माहिती घेईन. माहिती घेतल्यावर निश्चित आपल्याशी बोलेनं. माझ्या शेतकऱ्याला न्याय कसा देता येईल, प्रश्न कसे सोडवता येतील हा माझा प्रयत्न आहे” असं दत्तात्रय भरणे म्हणाले. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत, कृषी खात्यासाठी रोडमॅप काय असेल? या मुद्दावर ते म्हणाले की, “पदभार संभाळल्यानंतर यावर बोलणं उचित ठरेल. माझ्या शेतकरी बांधवासाठी जे काही करता येईल, ते करण्याचा माझ्या सारख्या कार्यकर्त्याचा प्रयत्न असेल” भरणेंच्या या उत्तराने संभ्रम वाढला आहे. त्यामुळे कर्जमाफी लवकर मिळेल, याबाबत आता साशंकता निर्माण होत आहे.





