भारतामध्ये देशभर इंडिगोची विमानसेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक उड्डाणे रद्द किंवा विलंबित झाल्यामुळे विमानतळांवर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रवासाची आगाऊ नोंदणी केलेल्या प्रवाशांचे नियोजन पूर्णपणे विस्कळीत झाले असून त्यांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. इंडिगोच्या सेवेत आलेल्या अडचणींचा परिणाम इतर विमान कंपन्यांच्या वेळापत्रकांवरही झाला आहे.
उड्डाण मार्गांमध्ये बदल, कमी उपलब्धता आणि वाढलेला प्रवासी ताण यामुळे संपूर्ण हवाई वाहतूक व्यवस्थेवर दबाव वाढला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि सेवा सुरळीत करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणे आणि इतर विमान कंपन्या प्रयत्नशील आहेत. त्यामुळे एकूणच विमानसेवेचे वेळापत्रक कधी पूर्वपदावर येईल, अशा स्वरूपाचा सवाल आता प्रवासी वर्गातून उपस्थित केला जात आहे.
इंडिगोची विमानसेवा कधी पूर्ववत होणार ?
कर्मचारी आणि FDTL नियमांमुळे विस्कळीत झालेली इंडिगोची विमानसेवा आता कमी विमानांसह पुन्हा सुरू झाली आहे. कंपनी 10 ते 15 डिसेंबरपर्यंत सामान्य वेळापत्रकावर परतण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, प्रवाशांना अपडेट्स आणि रिफंड मिळण्यात अडचणी येत आहेत. दिलासा देण्यासाठी स्पाइसजेट, एअर इंडियाने अतिरिक्त उड्डाणे सुरू केली असून, रेल्वेनेही जादा कोच जोडले आहेत. नागरी विमान वाहतूक मंत्रालय परिस्थितीवर 24×7 लक्ष ठेवून आहे. इंडिगो व्यवस्थापनानुसार, एअरलाइन्सचे ऑपरेशन पूर्णपणे सामान्य होण्यासाठी आणखी काही वेळ लागणार आहे. सध्याची परिस्थिती पाहता, इंडिगो 10 ते 15 डिसेंबरपर्यंत आपल्या सामान्य वेळापत्रकावर परत येऊ शकेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
इंडिगोचे वेळापत्रक कशामुळे कोलमडले ?
या संपूर्ण परिस्थितीचे मुख्य कारण म्हणजे ‘फ्लाइट ड्युटी टाइम लिमिट’ हा नवीन नियम. या नियमांमध्ये पायलट आणि क्रू मेंबर्सच्या कामाच्या तसेच विश्रांतीच्या वेळा काटेकोरपणे निश्चित करण्यात आल्या. हा नियम लागू झाल्यानंतर इंडिगोकडे दररोजच्या उड्डाणांची संख्या सांभाळण्यासाठी आवश्यक तेवढे पायलट आणि क्रू उपलब्ध नव्हते. यामुळेच छोट्या-छोट्या विलंबांचे रूपांतर हळूहळू मोठ्या संकटात झाले आणि शेवटी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. अशा वेळी फ्लाइट ड्युटी टाइम लिमिट म्हणजे नेमके काय, ज्यामुळे इंडिगोच्या शेकडो फ्लाइट्स जमिनीवरच उभ्या राहिल्या.

IndiGo कडे या नवीन नियमांनुसार ऑपरेशन्स सांभाळण्यासाठी आवश्यक तेवढे पायलट आणि केबिन क्रू नव्हते. ही एअरलाइन अत्यंत कमी कर्मचाऱ्यांमध्ये जास्तीत जास्त उड्डाणे चालविण्याच्या मॉडेलवर काम करते. 400 हून अधिक विमानांसह IndiGo दररोज 2,300 पेक्षा जास्त फ्लाइट्स ऑपरेट करते. त्यामुळे सिस्टमच्या एका भागातही अडचण आली तर संपूर्ण ऑपरेशनवर मोठा परिणाम होतो.