भारतामध्ये देशभर इंडिगोची विमानसेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक उड्डाणे रद्द किंवा विलंबित झाल्यामुळे विमानतळांवर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रवासाची आगाऊ नोंदणी केलेल्या प्रवाशांचे नियोजन पूर्णपणे विस्कळीत झाले असून त्यांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. इंडिगोच्या सेवेत आलेल्या अडचणींचा परिणाम इतर विमान कंपन्यांच्या वेळापत्रकांवरही झाला आहे. दुसरीकडे डिजिसीएने दिलेल्या दणक्यानंतर आता इंडिगोने तिकिटांचा कोट्यवधींचा रिफंड परत केल्याची माहिती समोर येत आहे.
इंडिगोकडून 610 कोटींचा तिकिट रिफंड
इंडिगोचे संकट सोमवारी सहाव्या दिवशीही सुरूच आहे. हजारो इंडिगो उड्डाणे रद्द करण्यात आली आहे, ज्यामुळे लाखो प्रवाशांना त्रास होत आहे. डीजीसीएच्या कडक कारवाईनंतर, विमान कंपनीने प्रवाशांना ६१० कोटी रुपये परत केले आहे. विमान कंपनीने आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंत डीजीसीएच्या नोटीसला उत्तर द्यावे. डीजीसीएने आधीच स्पष्ट केले आहे की जर प्रतिसाद मिळाला नाही तर कंपनीविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.

उड्डाणे सातत्याने रद्द; प्रवाशांना मनस्ताप
इंडिगोच्या विमानांचे उड्डाण सोमवारीही रद्द करण्याचे प्रकार सुरूच राहिले. दिल्ली विमानतळाने प्रवाशांसाठी सूचना जारी केली आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की इंडिगोच्या विमानांना होणारा विलंब सुरूच राहू शकतो. प्रवाशांना कोणत्याही गैरसोयी टाळण्यासाठी विमानतळावर जाण्यापूर्वी त्यांच्या एअरलाइनशी नवीनतम फ्लाइट स्टेटस तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे. इंडिगो एअरलाइन्सचे म्हणणे आहे की १५ डिसेंबरपर्यंत ऑपरेशन्स स्थिर होतील. सरकारचा दावा आहे की परिस्थिती पूर्वीपेक्षा सुधारली आहे. विमानतळांवरील चेक-इन, सुरक्षा आणि बोर्डिंग क्षेत्रांवर प्रवाशांच्या रांगा आता दिसत नाहीत.