MP Breaking News
Sun, Dec 14, 2025

लेकीच्या साखरपुड्यामुळे इंदुरीकर महाराज ट्रोल; रूपाली ठोंबरे पाटलांची ‘ती’ भावनिक पोस्ट चर्चेत

Written by:Rohit Shinde
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या शाही साखरपुड्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे महाराज व्यथित झाले. मात्र, राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी महाराजांना भावनिक आवाहन केलं आहे.
लेकीच्या साखरपुड्यामुळे इंदुरीकर महाराज ट्रोल; रूपाली ठोंबरे पाटलांची ‘ती’ भावनिक पोस्ट चर्चेत

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या शाही साखरपुड्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे महाराज व्यथित झाले. कीर्तनातून साधेपणाचा संदेश देणाऱ्या महाराजांनी लेकीच्या साखरपुड्यावर अवाढव्य खर्च केल्याने टीका झाली. यावर संतप्त होऊन महाराजांनी कीर्तन सेवा थांबवण्याचे संकेत दिले. मात्र, राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी महाराजांना भावनिक आवाहन केलं आहे. रूपाली ठोंबरे पाटील यांची एक भावनिक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

लेकीच्या साखरपुड्याचा थाट आणि टीका

इंदुरीकर महाराज सध्या त्यांच्या किर्तनामुळे नाही तर त्यांच्या लेकीच्या साखरपुड्यामुळे तूफान चर्चेत आहेत. इंदुरीकर महाराजांची लेक ज्ञानेश्वरी हिचा साखरपुडा संगमनेरच्या वसंत लॉन्समध्ये अत्यंत शाही पद्धतीने झाला. जवळपास 2000 लोकांची उपस्थिती आणि शाहीथाट बघायला मिळाला. महाराजांची लेक ज्ञानेश्वरी भला मोठा गाड्यांचा ताफा घेऊन मंगल कार्यालयात डोळ्यावर गॉगल लावून पोहोचली.

एक न्यारा थाट महाराजांच्या लेकीचा दिसला. मात्र, या साखरपुड्यातील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रसिद्ध किर्तनकार आणि समाजप्रभोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज टिकेचे धनी ठरले. वारकरी संप्रदायाकडून त्यांच्यावर टीका झाली. किर्तनात साधी लग्न करण्याचा उपदेश देणारे महाराज लेकीच्या साखरपुड्यात पैशांची उधळण करताना दिसले.

इंदुरीकर महाराज कीर्तन सोडणार ?

“कमेंट करणारे लोक बोलायला लागले, आता इंदुरीकरने फेटा ठेवून द्यावा. त्याचं त्याने चांगलं जगावं. आम्ही दोन तीन दिवसापासून विचार करतोय, दोन तीन दिवसात मी घेणारे निर्णय. पण मजा नाही राहिली त्याच्यात आता. तुम्ही दुसऱ्याला काहीच बोलत नाही” असे इंदुरीकर महाराज म्हणाले. त्यामुळे इंदुरीकर महाराज कीर्तन सोडणार की काय? अशी शक्यता सध्या निर्माण झालेली आहे. एकूणच आगामी दोन ते तीन दिवसांत इंदुरीकर महाराज त्यासंबंधीचा निर्णय घेण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

रूपाली ठोंबरेंच्या पोस्टमध्ये नेमकं काय?

” इंदुरीकर महाराज राम कृष्ण हरी. तुम्ही फेटा खाली उतरायचा नाही. महाराज तुम्ही सोशल मीडियाच्या विकृत लोकांमुळे व्यथित झाला साहजिकच होणार पण आपण आपल्या कर्तृत्वाने आपल्या कामाने सिद्ध आहात या सोशल मीडियाच्या विकृत छपरी जे माणूस नावावर कलंक आहेत यांच्या कडे अजिबात लक्ष देऊ नये. आपण आपल्या वारकरी प्रबोधनातून, किर्तन,भजनातून समाजातील माता,भगिनी,बंधू साठी अत्यंत मौल्यवान कार्य केले आहे.अध्यात्मिक शांती देत आहात. तेही या युगाशी समतोल साधून केले आहे.त्यामुळे आपण अजिबात व्यथित होऊ नका.

तुमच्यासारखे महाराज नसतील घर घरातील बिघडलेले स्त्री,पुरुष चांगल्या मार्गावर येणार कसे त्यांना सदबुद्धी,चांगले विचार,चांगले कर्माचा रस्ता सांगणार कोण? तुम्ही फेटा खाली उतरायचा नाही. तुमच्या सोबत अख्खा महाराष्ट्र आहे तुमचे कुटुंब म्हणून तुमच्या कुटुंबतील मी लेक आहे आमच्या भगिनी बद्दल कोण बोलत असेल तर त्या वेडी,विकृत माणसावर तुम्ही दुर्लक्ष करा. आम्ही पाहतो त्यांच्याकडे सोशल मीडियावर वेड्याचे सौंग घेण्याकडे त्या वेड्याचे सौंग काढण्याची सुद्धा हिंमत आहेत.त्यांची विकृती ठेचून काढू अजिबात व्यथित होऊ नका आणि फेटा खाली ठेवायचा नाही.ही माझी आपणास लेक म्हणून विनंती आहे. फेटा खाली ठेवायचा नाही.” अशा आशयाची पोस्ट रूपाली ठोंबरे पाटील यांनी केली आहे.