इंदुरीकर महाराज यांच्या कन्येचा नुकताच शाही साखरपुडा पार पडला. साखरपुड्याच्या निमित्ताने महाराजांवर झालेल्या वैयक्तिक टीकेमुळे ते अत्यंत व्यथित झाले. विशेषतः मुलीच्या पेहरावावरून आक्षेपार्ह कमेंट्स करण्यात आल्या होत्या. या टीकेमुळे कंटाळलेल्या इंदुरीकर महाराजांनी थेट कीर्तनसेवा थांबवण्याचा मोठा निर्णय घेण्याचे संकेत दिले असताना आता 10 नोव्हेंबर रोजीचा बदगी येथील कीर्तनातील एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये इंदुरीकरांनी मुलीच्या लग्नाबाबत मोठे भाष्य केले आहे.
मुलीचे लग्न टोलेजंग करणार -इंदुरीकर महाराज
बदगी येथील इंदुरीकर महाराजांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते म्हणतात “माझ्या मुलीचं लग्न मी ह्याच्यापेक्षा टोलेजंग करणार आहे!!!! बघू काय होईल!!!!…. मला माहित होतं या आवलादी माझ्या मुळावर उठणार आहेत. त्यांना हे चॅलेंज आहे.”….कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी काल केलेल्या कीर्तनात टीकाकारांना हे सडेतोड उत्तर दिलं आहे. मुलीच्या साखरपुड्यात तिचा पेहराव आणि झालेला खर्च पाहून अनेकांनी इंदुरीकर महाराज याना ट्रोल केलं होत. त्यामुळे थोडक्यात इंदुरीकर महाराजांनी आपल्या मुलीचे लग्न थाटामाटात करण्याचा निर्णय घेतल्याचे यातून स्पष्ट होते.

इंदुरीकर महाराज खरंच कीर्तन सोडणार का ?
इंदुरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी देशमुख आणि साहिल चिलाप यांचा साखरपुडा नुकताच पार पडला. या सोहळ्याचं आयोजन संगमनेरमध्ये करण्यात आलं होतं. राजेशाही थाटात मुलीची आणि जावयाची रथावरून राजेशाही मिरवणूक, पाहुण्यांच्या उपस्थितीने गच्च भरलेलं कार्यालय, वारकरी वेशात टाळकरी, बायकांनी धरलेला फेर चर्चेचा विषय ठरला. या कार्यक्रमाचे व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. या समारंभाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. मात्र या साखरपुड्यावरुन सोशल मीडियावरुन अनेकांनी इंदुरीकर महाराज यांच्यावर निशाणा साधला होता.
झालेल्या टीकेनंतर इंदुरीकरांनी मोठा निर्णय घेण्याचे संकेत दिले होते. “आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले, आता इंदुरीकरने फेटा ठेवून द्यावा. त्याचं त्याने चांगलं जगावं. आम्ही दोन तीन दिवसापासून विचार करतोय, दोन तीन दिवसात मी घेणारे निर्णय. पण मजा नाही राहिली त्याच्यात आता. तुम्ही दुसऱ्याला काहीच बोलत नाही” असे इंदुरीकर महाराज म्हणाले. त्यामुळे इंदुरीकर महाराज कीर्तन सोडणार की काय? अशी शक्यता सध्या निर्माण झालेली आहे. एकूणच आगामी काही दिवसांत इंदुरीकर महाराज त्यासंबंधीचा निर्णय घेण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.