अखेर इस्लामपूरच्या ईश्वरपूर नामकरणाला केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे. केंद्र सरकारच्या भारतीय सर्वेक्षण विभागाकडून मान्यतेचे पत्र प्राप्त झाले आहे. आता इस्लामपूर शहराच्या नावात कायदेशीर ईश्वरपूर असा बदल होणार आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावेळी शेवटच्या दिवशी मंत्री छगन भुजबळ यांनी सांगली जिल्ह्यातील ‘इस्लामपूर’ शहराचे नाव बदलण्याबाबत घोषणा केली होती. त्यानंतर खरंतर आता ही एक मोठी बातमी या निमित्ताने समोर येत आहे.
आता इस्लामपूर नव्हे; ईश्वरपूर म्हणायचं!
केंद्र सरकारच्या नामकरणाला दिलेल्या मंजुरीने प्रथम इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर करण्यात येईल. त्यानंतर ईश्वरपूर नगरपरिषद, ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघ असे नामकरण करण्यात येईल. याबाबत भाजप नेते रवींद्र चव्हण यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर केंद्राच्या मंजुरीचे पत्र पोस्ट करत निर्णय हिंदू अस्मितेचा, ऐतिहासिक वारसा जपणारा! असे म्हटले आहे.

निर्णय हिंदू अस्मितेचा, ऐतिहासिक वारसा जपणारा!
लोकभावनांचा सन्मान करणाऱ्या आपल्या मोदी सरकारने सांगलीमधील इस्लामपूर शहराचं नाव बदलण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. यापुढे आता इस्लामपूर शहर ईश्वरपूर नावाने ओळखलं जाईल. हा निर्णय केवळ नामपरिवर्तन नाही, तर भारतीय संस्कृती आणि ऐतिहासिक… pic.twitter.com/OKIamouf9z
— Ravindra Chavan (@RaviDadaChavan) October 24, 2025
40 वर्षांच्या मागणीला अखेरीस यश
गेल्या ४०-५० वर्षांपासून इस्लामपूर नाव बदलण्याची मागणी होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन इस्लामपूर प्रमुख पंत सबनीस यांनी काही दशकांपूर्वी शहराचे नाव ईश्वरपूर करण्याची मागणी केली होती. शिवाय, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी डिसेंबर १९८६ मध्ये इस्लामपूरमधील यल्लमा चौकात झालेल्या मेळाव्यात पहिल्यांदाच शहराचा जाहीरपणे ईश्वरपूर असा उल्लेख केला होता. त्यानंतर आता मोदी सरकारनेही या नामकरणाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता शहराचे नाव ईश्वरपूर असे संबोधले जाणार आहे.
इस्लामपूरच्या नामांतराबाबत मंत्रिमंडळाने निर्णय घेतला होता. नामांतराचा प्रस्ताव आता केंद्राकडे पाठवण्यात आला होता, त्याला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. आता शहराचे नामांतर ईश्वरपूर होईल. त्यानंतर मग ईश्वरपूर नगरपरिषद, ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघ यासह तालुका, जिल्हा, अशा सर्वच शासकीय, निमशासकीय सर्व स्वरूपाच्या व्यवसाय, उद्योग, संस्था, स्तरावर ईश्वरपूर हे नाव लागेल.