MP Breaking News
Thu, Dec 18, 2025

मुंबईत कबुतरखान्यावरून जैन समाज आक्रमक; जैन समाजाला कबुतरं इतकी प्रिय का? धार्मिक मान्यता काय?

Written by:Rohit Shinde
Published:
मुंबईतील दादरमधील कबुतरखान्यावरून जैन समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. जैन धर्मियांमध्ये कबुतरं इतकी प्रिय नेमकी का असतात, सर्व बाबी सविस्तर जाणून घेऊ...
मुंबईत कबुतरखान्यावरून जैन समाज आक्रमक; जैन समाजाला कबुतरं इतकी प्रिय का? धार्मिक मान्यता काय?

मुंबईतील दादर कबुतरखान्याचा वाद चांगलाच चिघळला आहे. आगामी काळात हा वाद आणखी पेटू शकतो. दादरमधील कबुतरखाना हटवण्यावरुन मोठा राडा झाल्याचे समोर आले आहे. जैन समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज अचानक जैन बांधवांनी दादरमधील कबुतरखान्याच्या ठिकाणी गर्दी केली. यावेळी संतप्त जमावाने कबुतरखान्यावर झाकलेली ताडपत्री हटवली आहे. जैन समाजाच्या आक्रमक भूमिकेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मुंबईमध्ये कबुतरखान्यांवरुन मोठा वाद सुरु आहे. हायकोर्टाच्या निर्णयानंतर दादरमधील कबुतरखान्यावर महापालिकेने कारवाई केली होती. पालिकेने याठिकाणी ताडपत्री झाकत हा कबुतरखाना बंद केला होता तसेच त्यांना खाद्य घालण्यासही बंदी करण्यात आली होती. त्यानंतर आक्रमक झालेल्या जैन समाजाने ताडपत्री हटवली. परंतु जैन समाजात कबुतरे इतकी लोकप्रिय का? त्याचे धार्मिक महत्व नेमके काय? हे सविस्तर जाणून घेऊ…

जैन समाजाला कबुतरे प्रिय, धार्मिक मान्यता काय?

जैन समाजामध्ये सर्व जीवमात्रांप्रती करुणा आणि अहिंसा ही अत्यंत मूलभूत तत्त्वे मानली जातात. या तत्वांनुसारच जैन समाज कबुतरांप्रती विशेष प्रेम आणि आपुलकी दर्शवतो. कबुतरे हे शांत, निरुपद्रवी आणि अहिंसक पक्षी मानले जातात. त्यांचा आहार शाकाहारी असून ते कोणत्याही जीवाची हिंसा करत नाहीत, त्यामुळे जैन धर्माच्या अहिंसेच्या तत्त्वाशी ते सुसंगत आहेत. त्यामुळेच कबुतरांचे संगोपन करणे, त्यांना अन्न-पाणी देणे किंवा त्यांच्यासाठी कबुतरखाने उभारणे हे जैन समाजात पुण्यकर्म मानले जाते.

जैन धर्मग्रंथांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की प्रत्येक प्राणी हा आत्मा असतो आणि प्रत्येक आत्म्याचा उद्धार करण्यासाठी त्याच्यावर करुणा आणि दया दाखवणे आवश्यक आहे. कबुतरांना अन्नदान केल्याने पुण्य लाभते, असे मानले जाते. अनेक जैन मंदिरांजवळ कबुतरांसाठी खास जागा ठेवलेली असते जिथे त्यांना नियमित धान्य आणि पाणी दिले जाते. काही जैन बांधव त्यांना स्वतःहून नियमितपणे अन्न देतात.

या धार्मिक श्रद्धेचा मूळ उद्देश म्हणजे जीवसृष्टीवर करुणा ठेवणे आणि अहिंसेचा प्रसार करणे. त्यामुळे कबुतर हे केवळ पक्षी नसून, जैन धर्माच्या मूलभूत तत्त्वांचे प्रतीक मानले जातात. या श्रद्धेमुळेच जैन समाजात कबुतरांप्रती विशेष आदर आणि जपवणूक दिसून येते.

मुंबईत तुर्तास कबुतरांना खाद्य घालता येणार

कबुतरखाना परिसरात कबुतरांच्या खाद्यपुरवठ्यावर निर्बंध आल्याने उपासमारीची वेळ त्यांच्यावर ओढवू नये, यासाठी पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत महानगरपालिकेने कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत आपल्या संवेदनशील मनाची पुन्हा एकदा ओळख देत कबुतरांचे प्राण वाचवून नागरिकांचे आरोग्य सांभाळण्यासाठी पुढाकार घेतला.