मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी महिलांना ईकेवायसी पूर्ण करावी लागणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे महिलांना मोठा धक्का बसला आहे. त्यातच E-KYC करताना OTP बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची तक्रार अनेक महिलांनी केली होती. आपले पैसे मिळण्याच बंद होतंय की काय अशी शंका महिलांच्या मनात येऊ लागली. मात्र आता महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत महिलाना दिलासा दिला आहे.
काय म्हणाल्या आदिती तटकरे?
आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेचे E-KYC करताना OTP बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून, तज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपायोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन E-KYC प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते, असं आदिती तटकरेंनी म्हटलं.

आता पती आणि वडिलांची ई केवायसी गरजेची
दरम्यान, लाडक्या बहिणींना आता 1500 रुपये मिळवण्यासाठी पती किंवा वडिलांची ई केवायसी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना स्वतःसोबतच त्यांच्या पतींची किंवा वडिलांची ई केवायसी करावी लागणार आहे. साहजिकच याठिकाणी उत्पन्नाचा दाखला गेमचेंजर ठरणार आहे. इथून पुढे लाभार्थी महिलेच्या उत्पन्नासह वडील किंवा पतीचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असल्यास अपात्र ठरवलं जाणार आहे. त्यामुळे अनेक महिलांचा लाडकी बहीण योजनेतून पत्ता कट होण्याची शक्यता आहे. सरकार दिवसेंदिवस लाडक्या बहिणींच्या (Ladki Bahin Yojana) अडचणीत वाढ करत आहे. निवडणुकीनंतर नवनवीन अतिशर्ती आणि पात्रता निकष लावल्याने आजअखेर लाखो महिला लाडकी बहिणी योजनेतून वगळल्या आहेत.











