ऑक्टोबर महिना उजाडला तरी सप्टेंबर महिन्याचा लाभ लाडक्या बहिणींना मिळालेला नाही. सप्टेंबर महिन्याचा लाभ अद्याप न मिळाल्याने लाडक्या बहिणी संभ्रमात आहेत. सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. खरंतर येत्या आठवडाभरात लाडक्या बहीणींच्या खात्यामध्ये 1,500 रूपये जमा केले जाण्याची शक्यता आहे. कारण, निधीची तरतूद करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळविण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचे 1,500 रूपये जमा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु, ई-केवायसी नसेल तर १,५०० रूपये मिळणार की नाही? असा सवाल लाडक्या बहिणींच्या मनात निर्माण झालेला आहे.
ई-केवायसी नसेल तर…
राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी निधीची जुळवाजुळव सुरु केल्याचं स्पष्ट झालं आहे. महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केल्यानुसार सर्व लाडक्या बहिणींनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांचा वेळ दिलेला आहे. त्यानुसार सप्टेंबर महिन्याचा हप्ता ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसला तरी मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता ई-केवायसी नसेल तरी मिळू शकतो. मात्र उर्वरीत मुदतीच्या आत ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी लागणार आहे.

२ महिन्यांत इ-केवायसी करून घ्या! (Ladki bahin yojana e-kyc)
चालू आर्थिक वर्षात हे परिपत्रक जारी झाल्यापासून 2 महिन्यांच्या आत ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे. ज्या लाभार्थ्यांनी या कालावधीत आधार प्रमाणीकरण केले नाही, ते पुढील कार्यवाहीसाठी पात्र ठरतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, भविष्यात दरवर्षी जून महिन्यात ही ई-केवायसी प्रक्रिया 2 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक असेल. ही प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सुलभ असून, ती भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठीही उपयुक्त ठरेल, असं महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे. शिवाय पती अथवा वडिलांची ई-केवायसी देखील महिलांना करावी लागणार आहे.
ई-केवायसीमुळे टेन्शन वाढलं!
लाडकी बहीण योजनेचे निकष डावलत लाभ घेणाऱ्या महिलांची धाकधुक वाढवणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाखो बोगस लाभार्थ्यांनी लाभ घेतल्याचे अनेक प्रसंग समोर आले आहेत. त्यामुळे आता सरकारने योजनेच्या प्रत्येक निकषाची कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे. यासाठी सरकारने आणखी एक महत्त्वाचा नियम लागू केला आहे. लाभार्थी महिलेला आता स्वत:सोबत वडिलांची किंवा पतीची देखील ई केवायसी करावी लागणार आहे.