MP Breaking News
Thu, Dec 18, 2025

पुरंदर विमानतळाच्या भुसंपादनाच्या कामाला गती येणार; एका निर्णयामुळे शेतकऱ्यांचा विरोध मावळण्याची चिन्हे

Written by:Rohit Shinde
Published:
पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादन प्रक्रियेस नवसंजीवनी मिळाली आहे. राज्य सरकारने नुकतेच आकर्षक पॅकेज जाहीर केल्याने शेतकऱ्यांचा विरोध मावळण्याची चिन्हे आहेत.
पुरंदर विमानतळाच्या भुसंपादनाच्या कामाला गती येणार; एका निर्णयामुळे शेतकऱ्यांचा विरोध मावळण्याची चिन्हे

पुणे जिल्ह्यातील पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनाच्या कामाला शेतकऱ्यांचा बऱ्याच काळापासून विरोध होता. त्यानंतर आता भूसंपादनाचा शेतकऱ्यांचा विरोध मावळण्याची चिन्हे दिसत आहेत. पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादन प्रक्रियेस नवसंजीवनी मिळाली आहे. राज्य सरकारने नुकतेच आकर्षक पॅकेज जाहीर केल्यानंतर सुरुवातीला सुमारे 100 शेतकऱ्यांनी आपली जमीन देण्यास सहमती दर्शवली आहे.

आकर्षक पॅकेज घोषीत; शेतकऱ्यांचा विरोध मावळणार?

सरकारने नुकतेच आकर्षक पॅकेज जाहीर केल्यानंतर सुरुवातीला सुमारे 100 शेतकऱ्यांनी आपली जमीन देण्यास सहमती दर्शवली आहे. ही प्रक्रिया ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वानुसार राबवली जात असून यामध्ये मोबदला आणि विकसित भूखंडांचा समावेश आहे. कुंभारवळण, एखतपूर, उदाची वाडी, मुंजवडी, खानवडी, पारगाव मेमाणे आणि वनपुरी या सात गावांतील एकूण 2673 हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. मागील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत भूसंपादनाच्या पॅकेजला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर तातडीने कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

एरोसिटीसाठी 10 टक्के परतावा राखून ठेवण्यासाठी 268 हेक्टर जमीन वेगळी ठेवली जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा हिस्सा विकसित भूखंडाच्या स्वरूपात परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.सध्या सासवड उपविभागीय कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयात संमतीपत्रे स्वीकारली जात आहेत. यामधून सुमारे 50 हेक्टर म्हणजेच 125 एकर जमीन संपादित करण्यासाठी पुढाकार घेतला गेला आहे.

पुरंदर विमानतळाचे विकासासाठी महत्व मोठे

भविष्यात शेतकऱ्यांना कोणत्या ठिकाणी किती भूखंड द्यायचे, हे ठरवण्याचे अधिकार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे देण्यात आले आहेत. औद्योगिक, वाणिज्यिक आणि निवासी उपयोगासाठी जमीन वाटप करताना सर्व नियोजन एमआयडीसीमार्फत होणार आहे. याअंतर्गत, 2019 च्या पुनर्वसन कायद्यानुसार शेतकऱ्यांना चौपट मोबदला आणि संपादित जमिनीच्या 10% विकसित भूखंड परत मिळणार आहेत. लवकरच आणखी शेतकरी संमती देतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे.

पुरंदर विमानतळाचे विकासासाठी मोठे महत्त्व आहे. पुणे शहराचा वेगाने होणारा विस्तार आणि वाढती वाहतूक पाहता, सध्याचे लोहगाव विमानतळ अपुरे पडत आहे. पुरंदर येथील नवीन विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे असेल आणि यामुळे औद्योगिक, व्यापारी व पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल. स्थानिक रोजगाराच्या संधी वाढतील, तसेच या भागाचा सर्वांगीण विकास होईल. माहिती तंत्रज्ञान, उत्पादन व निर्यात उद्योग यांना मोठा फायदा होईल. महाराष्ट्राच्या पश्चिम भागातील वाहतूक दळणवळण अधिक सुलभ होईल. त्यामुळे पुरंदर विमानतळ केवळ पुण्यासाठी नव्हे तर संपूर्ण राज्याच्या आर्थिक विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.