Leopard Attack : राज्याच्या अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचे माणसांवर होणारे हल्ले वाढत आहेत. लोकवस्तीवर आणि शेतात बिबट्या बिन्दास्त फिरताना दिसतो. बिबट्याने अनेकांचा जीव घेतल्याच्या घटना दररोज पाहायला मिळतायत. पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणात तर बिबट्याची मोठी दहशत आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्यांचे हल्ले रोखायचे तरी कसे यावर विचार सुरू असताना आता सरकारने बिबट्याचा नायनाट करण्यासाठी अजब प्लॅन आखला आहे. बिबट्या मानवी वस्तीत येऊ नये म्हणून जंगलातच शेळ्या किंवा बकऱ्या सोडण्याचा निर्णय सरकार घेणार आहे. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी याबाबत माहिती दिली आहे.
काय म्हणाले गणेश नाईक
गणेश नाईक यांनी म्हटले की, हिंस्त्र प्राण्यांना जे भक्ष्य पाहिजे ते भक्ष्य जंगलात उपलब्ध राहिलेले नाही. बिबट्याना जंगलात शिकार करणे आता सोपे नाही, कारण जंगलात त्यांना पुरेसे खाद्य उपलब्ध नाही. त्यामुळे बिबटे जंगलातून बाहेर पडून माणसावर आक्रमण करत आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये बिबट्यांना खाण्यासाठी शेळ्या किंवा बकऱ्या गळ्यात टॅग घालून सोडण्याचा आमचा विचार आहे. बिबट्यांना जंगलातच भक्ष्य मिळावे. त्यांनी गावात येऊन कुत्रे आणि माणसांवर हल्ले करु नयेत, यासाठी वनखात्याकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी जंगलात शेळ्या सोडण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. जुन्नर, आंबेगाव, शिरुर तालुक्यात तशी सुरुवातही झाली आहे, असे गणेश नाईक यांनी म्हटले.जसा प्रत्येक गावात एक नंदी असतो, तशाचप्रकारे या शेळ्या-बकऱ्या असतील. तुमच्या मुलाबाळांना आणि कुटुंबाच्या सदस्यांना बिबट्याचा धोका होऊ नये म्हणून काही ठिकाणी वनखात्याने या शेळ्या सोडल्या आहेत. Leopard Attack

बिबट्या हा आता ऊसातील जीव झालाय – Leopard Attack
बिबट्या हा पूर्वी वन्यजीव होता. आता तो ऊसातील जीव झाला आहे. जंगलापेक्षा ऊसाच्या फडात बिबट्यांची पैदास होत आहे. त्यामुळे बिबट्यांची संख्या वाढली आहे. बिबट्या हा शेड्यूल 1 मध्ये येणारा प्राणी आहे. त्याचा समावेश आता शेड्यूल 2 मध्ये करण्यात यावा, यासाठी आम्ही केंद्रीय वनखात्याला प्रस्ताव पाठवला आहे अशी माहिती गणेश नाईक यांनी दिली. दरम्यान, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये बिबट्यांची संख्या वाढत आहे. अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांत हल्ल्यांमध्ये सुमारे 20 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. वन विभागाच्या सर्व्हेक्षणानुसार राज्यात 2,285 बिबटे आहेत, तर सदस्यांच्या मते ही संख्या 5,000 पेक्षा जास्त असू शकते.