नवी मुंबईत लोकल रेल्वे नेटवर्कचा विस्तार होणार; उरण, नेरूळ, बेलापुरातील प्रवाशांना दिलासा

नवी मुंबईतील प्रवाशांच्या सोयीसाठी आता लोकल रेल्वेचे नेटवर्क विस्तारले जाणार आहे. नवी मुंबईतील उरण-बेलापूर-नेरूळ परिसरात लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ होणार आहे.

मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील लोकल रेल्वे सेवा ही लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी मानली जाते. दररोज कामावर जाणे-येणे, शिक्षण, व्यवसाय आणि दैनंदिन व्यवहार यासाठी लोकल हा सर्वात जलद, किफायतशीर आणि विश्वासार्ह पर्याय आहे. तथापि, प्रवाशांची प्रचंड संख्या, वाढते नागरीकरण आणि मर्यादित फेऱ्या यामुळे रेल्वे सेवेवर प्रचंड ताण येतो. गर्दीच्या वेळी अतिप्रचंड प्रवासीभार, प्लॅटफॉर्मवरील गोंधळ, तांत्रिक अडथळे आणि उशिरा धावणाऱ्या गाड्यांमुळे प्रवाशांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होते. वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीची मागणी लक्षात घेता, लोहमार्गांचे आधुनिकीकरण, नवीन गाड्यांची भर आणि नेटवर्क विस्तार गरजेचा बनला आहे. अशा परिस्थितीत आता नवी मुंबईत लोकल रेल्वे सेवेचा विस्तार केला जाणार आहे.

लोकल रेल्वे नेटवर्कचा विस्तार होणार

नवी मुंबईकरांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. नेरूळ–उरण आणि बेलापूर–उरण या उपनगरीय रेल्वे मार्गांवर लोकल फेऱ्यांची मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून नवी मुंबईकरांचा प्रवास खूप सोयीस्कर होणार आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या मागणीवर केंद्र सरकारने अखेर सकारात्मक निर्णय घेतला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या अतिरिक्त सेवांना मंजुरी दिल्याचे कळवले आहे.

या मंजुरीनुसार नेरूळ -उरण मार्गावर चार अतिरिक्त फेऱ्या तर बेलापूर–उरण मार्गावर सहा फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे नव्या सेवांमध्ये तरघर आणि गव्हाण स्थानकांचा समावेश करण्यात आला असून त्यामुळे या परिसरातील प्रवाशांना प्रथमच नियमित आणि अधिक सोयीस्कर रेल्वे सुविधा मिळणार आहेत.

लोकल रेल्वेच्या फेऱ्या वाढल्याने दिलासा

उरण परिसरातील हजारो चाकरमानी दररोज नवी मुंबई, पनवेल आणि मुंबईकडे नोकरीसाठी प्रवास करतात. विद्यार्थ्यांचीही मोठी संख्या या मार्गावरून कॉलेज आणि शाळांसाठी ये-जा करते. कमी फेऱ्यांमुळे प्रवाशांना आतापर्यंत मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. अतिरिक्त लोकल फेऱ्या सुरू झाल्यानंतर गर्दी कमी होऊन प्रवास अधिक सुटसुटीत, वेळेवर आणि आरामदायी होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः उरण परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. नवी मुंबईसह संपूर्ण रायगड जिल्ह्यातील प्रवाशांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार असून, हा मार्ग उपनगरीय वाहतुकीसाठी अधिक कार्यक्षम आणि सक्षम होणार आहे.  त्यामुळे या निर्णयाचे प्रवाशांमधून देखील स्वागत होताना दिसत आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News