दिल्लीतील स्फोटाच्या घटनेनंतर देशभरात सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या घटनेमुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने चिंता वाढली असून प्रमुख शहरांमध्ये पोलीस आणि गुप्तचर विभागांकडून सुरक्षा वाढविण्यात आली आहे. रेल्वे स्थानके, विमानतळे, शासकीय इमारती आणि गर्दीच्या ठिकाणी कडक नजर ठेवली जात आहे. अशा संपूर्ण परिस्थितीत महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत देखील हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई आणि नजीकच्या परिसरात मोठ्या हालचाली सध्या सुरू आहेत. एटीएसकडून मोठी कारवाई करण्यात येत आहे.
एटीएसची सर्वत्र छापेमारी सुरू
दिल्लीतील स्फोटानंतर महाराष्ट्र एटीएसने मंगळवारी मुंब्य्रात छापेमारी केली होती. या कारवाईत मुंब्रा येथून ताब्यात घेण्यात आलेल्या इब्राहिम आबादीचं कुर्ला कनेक्शन समोर आलं होतं. त्यानंतर आज कुर्ल्यातही छापेमारी करण्यात आली होती. कुर्ल्यातील एम के हाईट या आबादीच्या घरी एटीएसकडून ही कारवाई करण्यात आली आहे. या दरम्यान इब्राहिम आबादीची पहिली पत्नी आणि तीन मुले कुर्ला परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. आबादीने दुसरे लग्न केल्यानंतर कुर्ला परिसर सोडला होता,अशी माहिती समोर आली आहे.
खरंतर काही दिवसापूर्वी पुणे या ठिकाणी महाराष्ट्र एटीएसने धाड टाकून काही लोकांना अटक केली होती. यावेळी आरोपींची चौकशी दरम्यान मुंब्रा मध्ये राहणारा एका शिक्षकाचा संबंध असल्याचा माहिती समोर आली होती. आज महाराष्ट्र एटीएसने मुंब्रा येथील कौसा विभागामध्ये राहणाऱ्या एका शिक्षकाच्या घरी धाड टाकली होती. या धाडी दरम्यान घरातले मोबाईल कम्प्युटर आणि इतर सामग्री हस्तगत करण्यात आले होते. यासोबत मुंबईतील कुर्ल्यामधील त्याच्या दुसरा घरी महाराष्ट्र एटीएसने छापा टाकून पुढील तपास सूरू केला आहे.

पुण्यात अल-कायदाचं जाळं ?
अल-कायदा या दहशतवादी संघटनेचे साहित्य बाळगल्याच्या आरोपावरून एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला पुण्यातून अटक करण्यात आली होती. याच प्रकरणी आता महाराष्ट्र एटीएसने मुंब्रा भागात छापेमारी केली आहे. ‘अल कायदा इन इंडियन सबकाँटिनेन्ट’ या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ जिहादचा प्रसार-प्रचार करून देशाच्या एकता आणि सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याच्या आरोपावरून जुबेर इलियास हंगरगेकर याला अटक करण्यात आली होती.











