मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी मोठ्या हालचाली; MPCB च्या आदेशाने 19 आरएमसी प्लांट्स बंद

मुंबईसारख्या किनारपट्टीच्या शहरातही अशा उच्च प्रदूषणाची नोंद होत असल्याने, स्थानिक प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजनांची अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे या अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे.

मुंबईतील वातावरणाचा दर्जा दिवसेंदिवस ढासळू लागला आहे. मुंबईला कधीकाळी स्वच्छ आणि मोकळ्या हवेचे शहर म्हणून ओळखले जात होते. तरी २०२५ च्या पहिल्या सहा महिन्यांच्या हवा प्रदूषणाच्या आकडेवारीने मोठी चिंता वाढवली आहे. ‘सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर’ (CREA) या नामांकित संस्थेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार,मुंबईतील सायन आणि देवनार भागातील हवा चेन्नई-कोलकात्यापेक्षाही जास्त प्रदूषित असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही बाब निश्चितच मुंबईकरांची चिंता वाढवणारी आहे. अशा परिस्थितीत मुंबईतील वायू प्रदूषण वाढत असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मात्र मोठ्या हालचाली सुरू केल्या आहेत.

MPCB च्या आदेशाने 19 आरएमसी प्लांट्स बंद

शहरातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत असताना बीएमसी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) संयुक्तरीत्या प्रदूषणाच्या स्रोतांवर थेट कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा पहिला मोठा परिणाम म्हणून एमएमआर क्षेत्रातील तब्बल 19 आरएमसी प्लांट बंद करण्यात आले आहेत. मुंबई महानगर प्रदेशात एमपीसीबीकडून एकूण 32 सतत वातावरिण वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्रे (CAAQMS) कार्यरत आहेत. त्यापैकी 14 केंद्रे मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आहेत. ठाणे, कल्याण, नवी मुंबई आणि पनवेलमध्ये उर्वरित केंद्रे कार्यरत असून या सर्व केंद्रांतून ‘रिअल-टाइम एक्यूआय’ मोजून ‘समीर’ अॅपद्वारे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठवले जाते. याशिवाय राज्यभर 22 मोबाइल मॉनिटरिंग व्हॅन सतत प्रदूषण तपासणीसाठी तैनात आहेत.

मोबाइल व्हॅनद्वारे आरएमसी प्लांट, बांधकाम प्रकल्प आणि प्रदूषणप्रवण हॉटस्पॉट क्षेत्रांमध्ये सातत्याने तपासणी केली जाते. नियमांचे उल्लंघन आढळल्यास पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत तात्काळ कारवाई केली जाते. ऑक्टोबर 2025 मध्ये आरएमसी उद्योगांसाठी जारी केलेल्या सुधारीत मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीचे सर्वेक्षण सध्या सुरू आहे. सर्वेक्षणादरम्यान देवनार-गोवंडी परिसरातील 4 आरएमसी उद्योगांना तात्काळ कारखाना बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच 3 उद्योगांची प्रत्येकी 5 लाख रुपये बँक हमी जप्त करण्यात आली. सायन व संजय गांधी नगर परिसरातील 3 अनधिकृत मेटल प्रोसेसिंग भट्ट्या बंद करण्यात आल्या. वडाळा-माहुल भागात संध्याकाळच्या वेळी कचरा जाळल्याचे निदर्शनास आल्याने मुंबई पोर्ट ट्रस्टला तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मुंबईतील हवा प्रदुषण नियंत्रित करण्याची गरज

मुंबईसारख्या किनारपट्टीच्या शहरातही अशा उच्च प्रदूषणाची नोंद होत असल्याने, स्थानिक प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजनांची अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे या अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे. वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, वाहनांचे वाढते उत्सर्जन, बांधकाम प्रकल्प आणि कचरा जाळणे ही प्रदूषणाची प्रमुख कारणे मानली जातात.  मुंबईकरांनी देखील आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News