अलीकडच्या काळात भारतात बँकांच्या लुटीच्या घटना चिंताजनक प्रमाणात वाढल्या आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागांमध्ये बँकांवर हल्ले, एटीएम तोडफोड आणि सायबर चोरीच्या प्रकरणांमध्ये वाढ दिसून येते. या घटनांमुळे सामान्य नागरिकांमध्ये पैशांच्या सुरक्षिततेबाबत मोठी असुरक्षितता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत बीडमधील पाली गावातून धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे.
बीडमध्ये कॅनरा बँक लुटली!
बीड तालुक्यातील पाली गावात गुरुवारी पहाटे अज्ञात चोरांनी कॅनरा बँकेत घुसून अंदाजे १८.५ लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची खळबळजनक घटना घडली. रात्रीच्या अंधारात संपूर्ण परिसर गाढ झोपेत असताना ही घटना घडली. चोरांनी मागील भिंत तोडून बँकेत प्रवेश केला. त्यांनी गॅस कटरने लॉकर फोडून रोख रक्कम बाहेर काढली आणि पळून गेल्याचे वृत्त आहे.

चोरट्यांचा कसून शोध सुरू
घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि बँकेच्या परिसराची आणि आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली. चोरांनी वापरलेली साधने, भिंत फोडण्यासाठी वापरलेले खुणा आणि त्यांच्या पावलांचे ठसे जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी संशयितांची ओळख पटविण्यासाठी जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.











