Manoj Jarange Maratha Morcha : अखेर मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनाला अखेर यश आलं आहे. आज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं. सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली. मराठा उपसमितीने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्या असून लवकरच यासंदर्भातील जीआर काढणार असल्याचं वचन दिलं. दरम्यान या पाच दिवसात मराठा आंदोलनाची विविध अंगाने चर्चा झाली. आंदोलकांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. दक्षिण मुंबईत झालेल्या गर्दीमुळे सर्वसामान्य मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागला. अखेर आज मराठा आंदोलन मुंबई सोडून आपआपल्या गावी परततील असं वचन मनोज जरांगे पाटील यांनी दिलं आहे. (Maratha Reservation)
आंदोलनाचा पहिला दिवस ते मराठा आरक्षणाचा जीआर, मराठा आंदोलनाची A टू Z स्टोरी
मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारत मनोज जरांगे पाटील हजारो समर्थकांसह मुंबईत दाखल झाले. 28 ऑगस्टला अंतरवाली सराटीतून निघालेले जरांगे पाटील जुन्नरला शिवनेरीच्या पायथ्याशी नतमस्तक होऊन 29 ऑगस्टच्या पहाटे मुंबईच्या वेशीवर दाखल झाले. मराठ्यांचं भगवं वादळ घेऊन मुंबईत दाखल झालेल्या मनोज जरांगेंना ऐन गणेशोत्सवात आझाद मैदानात उपोषणाला परवानगी मिळू नये यासाठी बरेच प्रयत्न झाले. केवळ एका दिवसाच्या आंदोलनाचं आणि पाच हजार आंदोलक संख्येचं हमीपत्र देऊन प्रत्यक्षात हजारो आंदोलकांच्या साथीनं जरांगे पाटील मुंबईत दाखल झाले. सीएसएमटी परिसरात आणि मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी झाली. नवी मुंबई ते मुंबई या परिसरात रस्त्यारस्त्यांवर मराठा आंदोलकांनी ठाण मांडलं. आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही असा निर्धार करत जरांगे पाटील यांनी आझाद मैदानात उपोषण सुरू केलं.

त्यानंतर दोन ते तीन दिवस जरांगे पाटील यांच्यासोबत आलेल्या आंदोलकांमुळे मुंबई जेरीस आली. सीएसटी स्टेशन आणि परिसरात या गर्दीकडून सातत्यानं घोषणाबाजी करण्यात येत होती. मुंबई ठिकठिकाणी मराठा आंदोलक दिसत राहिले. काही ठिकाणी हुल्लडबाजीचेही प्रकार घडले. त्यावरून उलटसुलट चर्चा झाली. या सगळ्यात वेठीला धरण्यात आलेल्या मुंबईला मोकळा श्वास मिळावा अशी मागणी करत काहींनी हायकोर्टात धाव घेतली. सोमवारी हायकोर्टात झालेल्या सुनावणीत मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारपर्यंत मुंबईतील रस्ते रिकामे करावेत, असे आदेश हायकोर्टानं दिले. मनोज जरांगे यांचं आंदोलन शांततापूर्ण स्थितीत नसल्याची टिप्पणी हायकोर्टानं केली. या सगळ्या चार दिवसांच्या काळात सरकारकडूनही जोर बैठका सुरु होत्या. जरांगेंच्या मागण्या मान्य करता येतील का, याची चाचपणी करण्यात येत होती. त्यानंतर मंगळवारचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा ठरला. आंदोलकांवर पोलिसांची कारवाई, हायकोर्टात सुनावणी आणि जरांगेंसोबत सरकारच्या शिष्टमंडळाच्या चर्चेनं दिवस गाजला.
दिवसभरात काय घडलं?
सकाळी 9.30 वा.
आंदोलन बेकायदेशीर असल्याने जरांगे पाटील यांना पोलिसांची नोटीस
आंदोलनाला परवानगी नसल्याचे पोलिसांनी नोटिशीद्वारे कळवलं
आझाद मैदान परिसर खाली करण्याचे पोलिसांचे नोटिशीद्वारे आदेश
सकाळी 10.00 वा.
जीव गेला तरी आझाद मैदान सोडणार नाही, जरांगे पाटलांचं प्रत्युत्तर
पोलिसांकडून तीन नोटिसा, दोन स्वीकारल्या, जरांगेंनी नोटीस स्वीकारली नाही
दुपारी 12.00 वा.
मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन शिवेंद्रराजे भोसले यांच्यासोबत बैठक पार पडली.
दुपारी 1.00 वा.
हायकोर्टात सुनावणीत सरकारला ठोस कारवाईचे निर्देश
दुपारी 3 वाजेपर्यंत आझाद मैदान आणि रस्ते मोकळे करण्याचे कोर्टाचे निर्देश
दुपारी 2.00 वा.
आझाद मैदान, सीएसटी परिसरात पोलिसांची मोठी कुमक तैनात
मराठा आंदोलकांच्या गाड्या, आंदोलकांना हटवण्याचं काम सुरु
दुपारी 2.45 वा.
राधाकृष्ण विखे पाटील, शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह शिष्टमंडळ चर्चेसाठी आझाद मैदानात
आरक्षणाच्या शासन निर्णयाचा मसुदा जरांगे पाटील यांना दाखवला
दुपारी 3.00 वा.
मुंबई हायकोर्टात पुन्हा सुनावणी
मुंबई रिकामी करण्याचा आदेश कोर्टाकडून कायम
सूचनांचे पालन करण्याचे निर्देश, सुनावणी बुधवारपर्यंत पुढे ढकलली
दुपारी 4.15 वा.
मनोज जरांगेंच्या आठपैकी सहा मागण्या सरकारकडून मान्य
एका तासात जीआर काढण्याची सरकारची भूमिका
जीआर आल्यानंतरच निर्णय घेणार अशी मनोज जरांगेंची भूमिका
दुपारी 4.40 वा.
मनोज जरांगे समर्थकांचा आझाद मैदान, सीएसएमटी परिसरात जल्लोष
पाटील, पाटील, अशी जोरदार घोषणाबाजी
दुपारी 4.45 वा
राज्य सरकारचा मसुदा जरांगे यांच्यासह जरांगेंसोबत असलेल्या अभ्यासकांनाही मान्य
आंदोलकांच्या साथीमुळं जिंकलो, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली.
रात्री नऊपर्यंत मुंबई रिकामी करणार, अशी जरांगे पाटील यांची घोषणा
संध्याकाळी 5.00 वा.
मनोज जरांगे यांच्या मान्य झालेल्या मागण्यांचा जीआर सरकारनं काढला, त्यानंतर आझाद मौदानातील जल्लोषात भर पडली.
गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेल्या या आंदोलनाची सुरुवात अखेरीस गुलाल उडवून करण्यात आली.
या आंदोलनाची सांगता मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्याही विजयात झाली, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगतेय.











