MP Breaking News
Thu, Dec 18, 2025

आता पिक्चरवरुन मराठी Vs हिंदी वाद, ‘सैयारा’ला पायघड्या; ‘ये रे ये रे पैसा 3’ सिनेमाला स्क्रीन्स मिळेनात

Written by:Smita Gangurde
Published:
मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांची निर्मिती असलेल्या ये रे ये रे पैसा 3 या चित्रपटाच्या स्क्रीन्स काढून सैयाराला देण्यात आल्या आहेत.
आता पिक्चरवरुन मराठी Vs हिंदी वाद, ‘सैयारा’ला पायघड्या; ‘ये रे ये रे पैसा 3’ सिनेमाला स्क्रीन्स मिळेनात

मुंबई- मराठी विरुद्ध हिंदी वाद रस्त्यावर गाजला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या अमराठी व्यापाऱ्यांना अद्दल घडवली. आता हाच मराठी विरुद्ध हिंदी वाद 70 एमएमच्या मोठ्या पडद्यावर झळकायला सुरूवात झालीय. त्याचा पहिला ट्रेलर शुक्रवारी दिसला.

सध्या सैयारा नावाचा हिंदी चित्रपट खोऱ्यानं कमाई करतोय. आठवडाभरात 200 कोटींची कमाई करणाऱ्या सैयारासाठी मराठी सिनेमांच्या स्क्रीन्स काढून दिल्या जातायत. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांची निर्मिती असलेल्या ये रे ये रे पैसा 3 या चित्रपटाच्या स्क्रीन्स काढून सैयाराला देण्यात आल्या. त्यामुळं ,संतापलेल्या मनसेनं मल्टीप्लेक्सचालकांना खळ्ळ-खटॅकचा इशारा दिलाय.

हे सुडाचं राजकारण- मनसे

हे सुडाचं राजकारण आहे, यांना आम्ही ताळ्यावर आणू असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिलाय. मल्टिप्लेक्स चालक मराठी सिनेमांबाबत दुजाभाव करत असल्याचा मनसेचा आक्षेप आहे. याबाबत सरकारकडे या, असा सल्ला मत्स्यव्यवसायमंत्री नितेश राणेंनी दिला. मात्र मनसेला हे मान्य नाहीये. कारवाई करण्याऐवजी सरकारकडे येण्याचा सल्ला काशासाठी असा सवाल मनसेकडून विचारण्यात येतोय.

ठाकरेंच्या शिवसेनेचा मनसेला पाठिंबा

मनसेने या वादात आक्रमक भूमिका घेतली असताना ठाकरेंच्या शिवसेनेनंही मनसेला पाठिंबा दिलाय. संजय राऊतांनी यासंदर्भात समर्थन करणारी एक्स पोस्ट केलीय. मराठीसाठी सगळे एकत्र येत आहेत, लढत येत आहेत तरीही प्रश्न काही संपत नाहीत, सैयारा या हिंदी चित्रपटास थिएटर मिळावे म्हणून- “येरे येरे पैसा ३”या मराठी चित्रपटास उतरवण्यात आले. हे नेहमीचेच झाले आहे. मराठीचा लढा अधिक तीव्र करावा लागेल. मराठीचे खरे मारेकरी वेगळेच आहेत. अशी पोस्ट संजय राऊत यांनी केलीय.

जुन्या वादाला नवी फोडणी

हिंदी चित्रपटांसाठी मराठी चित्रपटांवर होणार अन्याय, हा काही आजचा वाद नाही. याआधी देखील मल्टीप्लेक्सचालकांनी वारंवार मराठी चित्रपट काढून तिथं हिंदी चित्रपट लावलेत. बॉक्स ऑफिसवर होणारी कमाई, हा त्यातला भाग आहेच. पण हिंदी विरुद्ध मराठी भाषा वाद पेटलेला असताना, मराठी चित्रपटांवरचा अन्याय यातून नवा वाद पेटणार असं दिसतंय