मुंबई – महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीनंतरही पाऊस थांबायचं नाव घेत नाही. मराठवाड्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीनं अनेक ठिकाणी अद्यापही पूरस्थिती कायम आहे. अशा स्थितीत रविवारी आणि पुढील आठवड्यातही राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
रविवारी पुणे आणि रायगडला रेड अलर्ट
हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार रविवारी रायगड आणि पुणे घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मुंबई, मुंबई उपनगगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा घाट, कोल्हापूर घाट, नाशिक घाट आणि संभाजीनगरमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मराठवाड्यात अतिवृष्टी सुरुच, महापुराचा फटका कायम
हिंगोली जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळं असा हाहाकार उडाला. कळमनुरी, वसमत तालुक्यात अतिवृष्टी झाली कयाधू नदीला पूर आला असून पाणी नदीकाठच्या शेतशिवारांमध्ये शिरलंय. पाणी इतकं वाढलंय की, विजेचे खांब देखील पाण्यामध्ये बुडालेत. वसमत तालुक्यातील कोंढुर, पांगरा शिंदे, कुरुंदासह अनेक गावांमध्ये पाण्याचा वेढा पडलाय.
अतिवृष्टामुळं कुरुंदा गाव पूर्णपणे बुडालंय. नागरिकांच्या छातीपर्यंत पाणी आलंय. जिथं नजर जाईल तिथं पाणीच पाणी दिसतंय. पाणी वाढत असल्यानं स्थानिक नागरिकांनी सुरक्षित स्थळी धाव घेतली आहे. पांगरा शिंदे गावातल्या गल्लीबोळीतून नदी वाहते आहे. दूध उत्पादक शेतकऱ्याचा पुरातून जीवघेणा प्रवास करावा लागतोय. हिंगोली जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळं इसापूर धरण 100 टक्के भरलं आहे. त्यामुळे धरणाचे 11 दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. परिणामी पैनगंगा नदीला पूर आला आहे. कळमनुरी-पुसद वरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. हिंगोली लगतच्या डोंगरगावालाही पाण्याचा वेढा पडलाय. कयाधु नदीला आलेल्या पूराचं पाणी पाणी शिरुन नुकसान झालंय.
लातूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस
लातूर जिल्ह्यातील अनेक भागाला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. औसा, निलंगा, अहमदपूर, उदगीर तालुक्यातील अनेक भागात पावसाचा जोर कायम आहे. या पावसामुळे नदी नाले ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले असून काही ठिकाणी पुलावरून पाणी जात असल्याने हे मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. जिल्ह्यातून वाहणाऱ्या मांजरा, तेरणा आणि तावरजा या नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झालीय. तावरजा नदीला आलेल्या पुलाचा आलमला शिवाराला मोठा फटका बसलाय. पुराचे पाणी नदीकाठच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात गेल्याने परिसरातील शिवारातील पिके पाण्याखाली गेलीत
परभणीतही मुसळधार, जनजीवन विस्कळीत
परभणी जिल्ह्यात पासून मुसळधार पाऊस बरसतोय. त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे तर जनजीवन विस्कळीत झालंय. गंगाखेड तालुक्यातील मसाला, झोला प्रिंप्री या गावांना गोदावरीच्या पाण्यानं वेढा घातला आहे. गेल्या आठवड्यात हिंगोली, परभणीसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात हाहाकार उडाला होता. आता पुन्हा एकदा पावसानं आपलं रौद्ररुप दाखवण्यास सुरुवात केलीय. शेतकरी या पावसानं हवालदिल झाले असून जगायचं कसं असा प्रश्न त्यांना पडलेला आहे.











