महाराष्ट्रातील महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटना हा समाजासाठी गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. विविध प्रकारचे अत्याचार छेडछाड, घरगुती हिंसा, लैंगिक अत्याचार, मानहानी यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होताना दिसते. सामाजिक असुरक्षितता, अपुरी कायदेशीर अंमलबजावणी, धीमे न्यायप्रक्रिया आणि मानसिकता बदल न होणे ही प्रमुख कारणे मानली जातात. महिलांच्या सुरक्षिततेसाठी कडक कायदे असले तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. अशी सगळी एकूण परिस्थिती असताना ठाण्यातून एक धक्कादायक अशा स्वरूपाची घटना समोर आली आहे.
ठाण्यात कारमध्ये महिलेवर अत्याचार
काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून फेमिली कोर्टाच्या आवारात एका विवाहित महिलेवर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पीडितेने दोघांविरुद्ध 5 डिसेंबर 2025 रोजी ठाणे नगर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली आहे. तर दुसरा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

पीडितेच्या तक्रारीवरून तिने सोशल मीडियावर जाहिरात बघून आरोपींशी संपर्क साधला. आरोपींनी तिला ठाण्यात बोलावले आणि चांगले काम देण्याचं आमिष दाखवत तिला विश्वासात घेतले. नंतर त्यांनी महिलेला एका स्पा सेंटर मध्ये काम मिळवून दिले. घटनेच्या दिवशी 25 ऑगस्ट 2025 रोजी एका आरोपीने रात्री 8 :30 वाजेच्या सुमारास स्पा सेंटर मध्ये जाऊन महिलेकडून मसाज करून घेतला नंतर माझा वाढदिवस आहे असे सांगून महिलेला आपल्या कार मध्ये बोलावले. तिला घेऊन त्याने कार ठाणे फेमिली कोर्टाच्या आवारात नेली.
आरोपीने तिथे कार थांबवली आणि केक कापला. आरोपीने केक मध्ये आधीच गुंगीचे औषध मिसळले होते. केक खाऊन महिला बेशुद्ध झाली. बेशुद्ध अवस्थेतच महिलेवर दोघांनी सामूहिक बलात्कार केला. तिचे अश्लील व्हिडीओ काढले नंतर रात्री 11 वाजेच्या सुमारास महिलेला रस्त्यावर एकटे सोडून पळून गेले.
व्हिडिओ, ब्लॅकमेल आणि अत्याचार
व्हिडीओ व्हायरल होऊन बदनामी होईल या भीतीने महिला गप्प बसली. नंतर आरोपी तिला ब्लॅकमेल करू लागले. तिने कंटाळून 5 डिसेंबर 2025 रोजी तिने आपल्या मैत्रिणीला आणि ओळखीच्या वकिलाला घडलेलं सर्व सांगितलं आणि पोलीस ठाणे गाठले. तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. नगर पोलिसांनी आरोपींवर सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक केली आहे. तर दुसरा आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
त्यामुळे एकूणच सध्या राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न किती गंभीर बनला आहे, ते यावरून अधोरेखित होते. संरक्षणाचे प्रशिक्षण, समाजातील जागरूकता, महिलांसाठी सुरक्षित सार्वजनिक ठिकाणे आणि तक्रार नोंदविण्यासाठी संवेदनशील यंत्रणा निर्माण करणे अतिशय महत्त्वाचे आहे. महिलांचा सन्मान आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले गेले तरच हा प्रश्न कमी होऊ शकतो.











