मुंबई लोकल ही शहराची जीवनरेखा मानली जाते. परंतु रविवारी होणाऱ्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. रेल्वेच्या देखभाल आणि दुरुस्ती कामांसाठी हा मेगाब्लॉक आवश्यक असला तरी त्यामुळे अनेक गाड्या उशिरा धावतात किंवा रद्द होतात. प्रवाशांना लांब रांगा, गर्दी, उशीर आणि असुविधा यांचा सामना करावा लागतो. अनेक वेळा पर्यायी प्रवास व्यवस्था नसल्याने कामावर जाणारे आणि प्रवास करणारे लोक अडचणीत सापडतात.
उद्या रविवारी, 14 डिसेंबर रोजी देखील मुंबईत मेगाब्लॉक असणार आहे. रेल्वेच्या मध्य आणि पश्चिम मार्गावर रविवारी (14 डिसेंबर) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरांतील प्रवाशांना काहीसा त्रास सहन करावा लागणार आहे.
रविवारी मध्य आणि पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागात विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे मुख्य मार्ग, ट्रान्स हार्बर मार्ग तसेच पश्चिम रेल्वेवरील काही मार्गांवर अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून काही लोकल मार्ग बदलून धावणार आहेत. रेल्वे रुळ, सिग्नल प्रणाली आणि इतर पायाभूत सुविधांची दुरुस्ती व देखभाल करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही मार्गांवरील लोकल सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद राहतील, तर काही लोकल धीम्या मार्गावर किंवा जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
हा मेगाब्लॉक रविवारी सकाळपासून दुपारपर्यंत विविध टप्प्यांत घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.45, ट्रान्स हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10, तर पश्चिम रेल्वेवर सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ब्लॉक राहणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असेल. ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी/नेरुळदरम्यान अप व डाऊन मार्ग बंद राहतील. पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगाव स्थानकांदरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
दररोज लोकलने प्रवास करणारे लाखो प्रवासी या मेगाब्लॉकमुळे प्रभावित होणार आहेत. विशेषतः ठाणे, नवी मुंबई, पश्चिम उपनगर तसेच मध्य मुंबईतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवासात विलंब आणि गर्दीचा सामना करावा लागू शकतो. रेल्वे प्रशासनाकडून सुरक्षित आणि सुरळीत प्रवासासाठी आवश्यक असलेल्या अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी नियमितपणे मेगाब्लॉक घेतला जातो. रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणांचे अद्ययावतीकरण आणि इतर तांत्रिक कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी हा ब्लॉक आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
लोकलचे वेळापत्रक दिवसभर विस्कळीत होणार
मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.36 ते दुपारी 3.10 दरम्यान सुटणाऱ्या डाऊन जलद लोकल माटुंगा येथे धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तसेच ठाण्याहून सकाळी 11.03 ते दुपारी 3.38 दरम्यान सुटणाऱ्या अप जलद लोकलही मार्ग बदलून धावतील. ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी/नेरुळदरम्यान लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार असून अनेक लोकल रद्द करण्यात येतील. पश्चिम रेल्वेवर गोरेगाव ते बोरिवलीदरम्यान लोकल जलद मार्गावर चालवण्यात येणार असून काही लोकल रद्द राहतील.
वेळापत्रक पाहून प्रवास करा!
या मेगाब्लॉकच्या काळात प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा, असे आवाहन सातत्याने रेल्वे प्रशासनाकडून केले जात असते. बऱ्याचदा अनेक गाड्या उशिरा येतात, विलंब होतो अशावेळी प्रवाशांनी पर्यायी प्रवासाच्या साधनांचा वापर करावा. शिवाय पावसाचे दिवस असल्याने आणखी काळजी घेणे आवश्यक ठरते.





