मुंबईत रेल्वे प्रशासनाकडून रविवारी मेगाब्लॉक घेतला जातो. या मेगाब्लॉकमध्ये दुरुस्ती, देखभाल आणि सिग्नल तसेच ट्रॅक बदलण्याचे काम केले जाते. पण या कामांमुळे अनेकदा प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. रविवारीदेखील प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना, कार्यालयीन कर्मचाऱ्यांना, परीक्षेला जाणाऱ्या उमेदवारांना आणि कौटुंबिक कारणांसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना गाड्या उशिरा मिळतात किंवा मार्ग बदलून जावं लागतं. उद्या 28 सप्टेंबरला म्हणजेच रविवारी मुंबईत लोकल रेल्वेच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक
रेल्वे मार्गावरील देखभाल आणि दुरुस्ती कामांसाठी 28 सप्टेंबर रविवार रोजी मध्य व ट्रान्स हार्बर रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेच्या विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान पाचवा आणि सहावा मार्ग टाकण्यासाठी ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या सेवांवर परिणाम होईल.

मध्य रेल्वे
विद्याविहार ते ठाणे स्थानकांदरम्यान पाचवा आणि सहावा मार्ग टाकण्यात येणार आहे. यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील मेन लाईनवर सकाळी 8:00 ते दुपारी 1:30 या वेळेत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉक दरम्यान डाऊन मार्गावरील मेल-एक्सप्रेस गाड्या अप आणि डाऊन जलद मार्गावरून धावणार असल्यामुळे साधारण 10 ते 15 मिनिटे उशिरा पोहोचतील.
ट्रान्स हार्बर
ठाणे ते वाशी, नेरूळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येईल. या ब्लॉक कालावधीत ठाणे–वाशी/नेरूळ दरम्यानची लोकल सेवा बंद राहणार आहे.
पश्चिम रेल्वे
चर्चगेट ते मुंबई CSMT स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर सकाळी 10:35 ते दुपारी 3:35 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉक दरम्यान चर्चगेट–CSMT (लोकल) धीम्या मार्गावरील सर्व गाड्या जलद मार्गावर धावतील. काही उपनगरी गाड्या रद्द केल्या जातील, तर काही चर्चगेट गाड्या वांद्रे व दादर स्थानकांवर शॉर्ट टर्मिनेट केल्या जातील.
वेळापत्रक पाहून प्रवास करा!
या मेगाब्लॉकच्या काळात प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा, असे आवाहन सातत्याने रेल्वे प्रशासनाकडून केले जात असते. बऱ्याचदा अनेक गाड्या उशिरा येतात, विलंब होतो अशावेळी प्रवाशांनी पर्यायी प्रवासाच्या साधनांचा वापर करावा. शिवाय पावसाचे दिवस असल्याने आणखी काळजी घेणे आवश्यक ठरते.











