Weather Update: महाराष्ट्रातील यंदाचा पाऊस संपला? पावसाची सद्यस्थिती नेमकी काय? जाणून घ्या!

महाराष्ट्रातील यंदाचा पावसाळा जवळपास संपल्याच्या स्थितीला पोहोचला आहे. स्थानिक वातावरणामुळे काही ठिकाणी पाऊस पडता असला तरी जोर नाही. त्यामुळे पाऊस निरोप घेण्याच्या मार्गावर आहे.

राज्यात 8 ऑक्टोबरपासून मान्सून राज्यातून निरोप घेईल असे देखील सांगण्यात आले. आता पुढील काही दिवस राज्यात पावसाची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात आले आहे. पावसाने उघडीप दिल्याने काही भागात तापमानाचा पारा चढा आहे. संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी होणार असून गेल्या आठवड्यात पडलेल्या पावसानंतर आता फारशा पावसाची शक्यता नाही. त्यामुळे एकूणच यंदाचा पाऊस राज्यातून निरोप घेण्याच्या स्थितीला पोहोचला आहे.

महाराष्ट्रात पावसाची पूर्ण उघडीप

राज्यात गेल्या काही दिवसांपासून शक्ती चक्रीवादळ किंवा बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे काहीसा पाऊस बरसण्याची शक्यता होती. मात्र तरी पावसाचा तितकासा प्रभाव दिसलेला नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांत पाऊस पूर्णपणे उघडीप देईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीपाच्या कामांना वेग देता येणार आहे. अधूनमधून हलक्या सरी बरसतील. मात्र, मुसळधार पावसाची शक्यता कमी असेल. असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. शिवाय ऑक्टोबर हीटचा प्रभाव जाणवत आहे.

हवामान विभागाचा अंदाज काय?

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोकण किनारपट्टीवरील पावसाचा जोर कमी झाल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांत रिमझिम ते मध्यम पाऊस झाला होता. मात्र आज 6 ऑक्टोबर रोजी हवामान स्थिर असून, कोणत्याही जिल्ह्यासाठी हवामान विभागाने अलर्ट जारी केलेला नाही. त्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळालेला आहे. शक्ती चक्रीवादळ आता उत्तरेकडे सरकलं आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 7 ऑक्टोबरपासून पुन्हा काही भागांत हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या पाऊस विश्रांती घेत असला तरी, पुढील काही दिवसांत पुन्हा रिमझिम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News