पुण्यात खासगी ट्रॅव्हल्स मालकांची मक्तेदारी; प्रवाशांकडून वाढीव भाड्याची वसूली

नियमांनुसार, खासगी ट्रॅव्हल्स चालकांना एसटी बसच्या तिकीट दराच्या दीडपट इतकेच तिकीट घेता येणे अपेक्षित आहे. मात्र दुप्पट ते तिप्पट पैसे वसूल केले जात आहेत.

जीएसटी सुधारणा लागू झाल्या असून स्वयंपाक घरातील वस्तूंपासून इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत दर कमी झाले आहेत. या सुधारणांत ट्रॅव्हल्स प्रवासासाठी ‘जीएसटी’ची सवलत मिळण्याची अपेक्षा होती. परंतु, तिकीट बुकिंगवर 5 टक्के जीएसटी कायम आहे. त्यामुळे खासगी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री कायम आहे. ऐन दिवाळीच्या काळात काही ट्रॅव्हल्स कंपन्या तिप्पट भाडे आकारताना दिसत आहेत. पुण्यात देखील खासगी ट्रॅव्हल्स चालकांची मक्तेदारी पाहायला मिळत आहे. दिवाळीत एसटी, रेल्वे फुल्ल असतात. अशावेळी प्रवासी खासगी ट्रॅव्हल्सचा आधार घेतात. मात्र प्रवाशांना लुटलं जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट

दिवाळीच्या सणाच्या काळात गावी जाणाऱ्या नागरिकांची संख्या नेहमीपेक्षा जास्त असते. यंदा रेल्वेच्या तिकीटांची बुकिंग पूर्ण झाल्यामुळे अनेक रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांना जागा मिळत नाही. परिणामी, गावी जाणाऱ्या प्रवाशांना खासगी बसांवर अवलंबून रहावे लागत आहे. मात्र, अनेक खासगी बस चालकांनी तिकीट दरात अचानक दुपटीपेक्षा जास्त वाढ केली आहे. प्रवाशांना यामुळे मोठा आर्थिक ताण बसला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातून नोकरी, शिक्षण आणि व्यवसायासाठी अनेक विद्यार्थी आणि नोकरदार इतर शहरांकडे प्रवास करतात. दिवाळीच्या सणानिमित्त हजारो नागरिक आपल्या गावी जातात. मात्र, शहरातून विदर्भ आणि मराठवाडा येथे जाणाऱ्या बस चालकाशी तिकीट दर दुपटीपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे.

ऐन दिवाळीत प्रवाशांना मनस्ताप

एसटी महामंडळाने गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी अतिरिक्त बस सुविधा दिल्या आहेत, पण त्या देखील काही दिवसांतच फुल्ल बुक झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना फक्त खासगी ट्रॅव्हल्सवर अवलंबून रहावे लागले आहे. अनेकांनी तर काही महिन्यांपूर्वीच लांब पल्ल्याच्या प्रवासाची बुकिंग केली होती, पण आता देखील दिवाळीच्या काळात तिकीट महाग झाले आहे. सध्या खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी तिकीट दर दुपटी ते तिप्पट केल्याचे दिसून आले आहे. उदाहरणार्थ, शहरातून नागपूरला जाण्यासाठी आधी साधारण 1700 ते 2000 रुपये तिकीट लागायचे, तर आता ते थेट साडेतीन ते चार हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे. नियमांनुसार, खासगी ट्रॅव्हल्स चालकांना एसटी बसच्या तिकीट दराच्या दीडपट इतकेच तिकीट घेता येणे अपेक्षित आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News