मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. मुंबईतील मोनोरेल सेवा 20 सप्टेंबरपासून अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मोनो रेलमध्ये वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडांमुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण प्रणालीमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याने हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अनिश्चित काळासाठी ही मोनोरेल बंद ठेवण्यात येणार आहे.
सातत्याने होणाऱ्या बिघाडांमुळे निर्णय
मोनोरेलवर सातत्याने होत असलेल्या अपघातांमुळे मोनोरेल सेवा तात्पुरती बंद करण्याचा निर्णय एमएमआरडीने घेतला आहे. चेंबूर ते सात रस्ता अशी मोनोरेल सध्या चालवण्यात येत होती. या संपूर्ण भारतातील एकमेव असलेल्या मोनोरेलवर नादुरुस्त गाड्यांमुळे अलिकडे वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे अपग्रेडेशन साठी ही सेवा आता २० सप्टेंबर २०२५ पासून काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मोनोरेल अनेकवेळा अपघात झाले आहेत. अलिकडे १९ ऑगस्ट रोजी मोठा पाऊस पडल्याने सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास म्हैसूर कॉलनीजवळ मोनोरेल अडकली होती. यात ५८२ हून अधिक प्रवासी दोन ते तीन तास अडकले होते.अग्निशमन दलाने अखेर या प्रवाशांची सुटका केली. याच वेळी आचार्य अत्रे नगर स्थानकात आणखी एक मोनोरेल अडकली होती. त्यातून २०० प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. मोनोरेल भारताची एकमेव मोनोरेल प्रणाली असून १९.७४ किमी मार्गावर संत गाडगे महाराज चौक ते चेंबूरपर्यंत ती चालवण्यात येते.
तांत्रिक त्रुटींवर काम केले जाणार
मोनोरेल बंद केल्यानंतर या ब्लॉक काळात तिचे भविष्यातील संचलन योग्य प्रकारे होण्यासाठी अनेक तांत्रिक काम केली जाणार आहेत. या मार्गावर नव्या गाड्यांचे परिचलन योग्य प्रकारे होण्यासाठी CBTC सिग्नलिंग प्रणाली अपग्रेड करण्यात येणार आहे. सध्या गाड्यांची डागडुजी केली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षित आणि निर्धोकपणे वाहतू केली जाईल.
समोर येणाऱ्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून मोनोरेलमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत आहेत. यामुळे प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात येत आहे. त्यामुळे संपूर्ण प्रणालीची तपासणी करून ती दुरुस्त करण्यासाठी मोनोरेल सेवा काही काळासाठी थांबवण्यात येणार आहे. नवीन रेक बसवले जातील आणि त्यानंतर मेट्रो रेल सुरक्षा आयुक्तांकडून कॉरिडोरची तपासणी केली जाईल. त्यानंतरच ही सेवा पुन्हा सुरू करण्यात येईल.











