मुंबईतील मुंबादेवी मंदिर हे शहराचे आराध्य दैवत मानले जाते. मुंबई या नावाची उत्पत्तीही मुंबादेवीवरून झाली असल्याने या मंदिराला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व आहे. मुंबादेवी देवीला शक्तीस्वरूप मानले जाते आणि लाखो भक्तांची तिच्यावर अपार श्रद्धा आहे. व्यवसाय, कुटुंब, आरोग्य आणि संकट निवारणासाठी भक्त देवीकडे नवस करतात. नवरात्रोत्सवात येथे मोठी गर्दी पाहायला मिळते. मुंबादेवी मंदिर हे मुंबईकरांच्या श्रद्धेचे केंद्र असून शहराच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग आहे. अशा या मुंबईतील मुंबादेवी मंदिर आणि परिसराचा आता विकास होणार आहे.
मुंबादेवी मंदिर परीसराचा कायापालट होणार !
मुंबईतील ऐतिहासिक मुंबादेवी मंदिर संकुलाच्या विकासाचा मार्ग आता मोकळा दिसत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत माहिती दिली की बृहन्मुंबई महानगरपालिका या प्रकल्पासाठी ई-निविदा जारी करण्याच्या प्रक्रियेत आहे. उज्जैनच्या महाकाल कॉरिडॉरच्या मॉडेलनुसार हा विकास केला जाईल, ज्यामुळे हे संकुल अधिक सुव्यवस्थित, आकर्षक आणि पर्यटकांसाठी अनुकूल होईल.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की मुंबई वारसा संवर्धन समितीने या प्रकल्पाला “नो ऑब्जेक्शन” दिली आहे. उर्वरित काम आता अंतिम टप्प्यात आहे आणि महानगरपालिका आयुक्तांच्या मंजुरीनंतर निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. २०२३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबादेवी परिसराच्या व्यापक पुनर्विकासाची घोषणा केली. मुंबादेवी ही मुंबईची कुलदैवत मानली जाते आणि शहराचे नाव तिच्या नावावर ठेवण्यात आले आहे.
मुंबईची मुंबादेवी आणि भक्तांची अफाट श्रद्धा
मुंबईतील मुंबादेवी मंदिराला दरवर्षी लाखो भक्तांची ये-जा असते. देशभरातून तसेच परदेशातूनही भाविक देवीच्या दर्शनासाठी येथे येतात. मुंबादेवी देवीला शक्ती आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते. संकटात सापडलेल्या भक्तांना मानसिक शांती आणि आधार मिळतो, अशी श्रद्धा आहे. नवरात्रोत्सव, पौर्णिमा आणि विशेष धार्मिक दिवसांमध्ये मंदिर परिसर भक्तांनी फुलून जातो. मुंबादेवी मंदिर हे केवळ पूजास्थान नसून अध्यात्मिक ऊर्जेचे केंद्र आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला श्रद्धा, शांतता आणि सकारात्मकतेचा अनुभव येतो.





