मुंबईत अलीकडच्या काही वर्षांत मेट्रोचा विस्तार अत्यंत वेगाने झाला. मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) हा भारतातील सर्वात गतिमान आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा प्रदेश आहे. या प्रदेशाच्या भविष्यातील विकासासाठी आणि त्याला जागतिक आर्थिक केंद्र बनवण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी आर्थिक मास्टर प्लान सरकारकडून तयार करण्यात आला आहे. देशाची आर्थिक राजधानी असेलली मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरांमधील विमानतळांना जोडणारा मेट्रो मार्ग कसा असणार याची माहिती समोर आली आहे.
मुंबई-नवी मुंबई विमानतळ जोडले जाणार!
मुंबई महानगर प्रदेशातील विमानतळ कनेक्टिव्हिटी सुधारण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ थेट जोडण्यासाठी एक नवीन मेट्रो कॉरिडॉर – मेट्रो लाईन 8 – ची योजना आखली जात आहे. गोल्ड लाईन म्हणून ओळखला जाणारा हा 35 किलोमीटरचा मार्ग केवळ दोन प्रमुख विमानतळांनाच नव्हे तर मुंबई आणि नवी मुंबई या शहरांना जोडणारा पहिला मेट्रो मार्ग असेल. मेट्रोच्या या मार्गिकेमुळे मुंबईतील मेट्रोचे जाळे एक वेगळीच उंची गाठणार आहे. शिवाय यामुळे दोन्ही महत्वाच्या विमानतळांदरम्यानची वाहतूक अधिक सुलभ आणि सोयीस्कर होणार आहे.
या मेट्रो मार्गाचा डीपीआऱ म्हणजेच सर्वसमावेशक प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून तो सरकारकडे सादर करण्यात आला आहे. लवकरच या अहवालाला मंजुरी मिळेल असा विश्वास सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी व्यक्ते केला आहे.मेट्रो मार्ग अंधेरीतील सीएसएमआयए टर्मिनल 2 पासून सुरू होईल आणि चेंबूरमधील छेडानगरपर्यंत भूमिगत जाईल. तेथून, तो एनएमआयए पर्यंत एलिव्हेटेड कॉरिडॉर म्हणून धावेल. या मार्गावरील प्रमुख ठिकाणे कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी), मानखुर्द, वाशी, नेरुळ आणि बेलापूर आहेत.
नेमकी कशी असेल मेट्रो-8 मार्गिका?
या मार्गिकेची एकूण लांबी सुमारे 34.89 किमी असणार आहे. यामध्ये मेट्रोचा वेग – 90 किमी/ताशी वेगाने धावण्यासाठी डिझाइन केलेले, जे इतर मेट्रो मार्गांपेक्षा वेगवान बनवते. नवी मुंबई क्षेत्रातील मार्गाची लांबी सुमारे 21 किमी असणार आहे. एकूण 20 स्थानके यामध्ये असणार आहेत. यामधील काही स्थानके ही भूमिगत अशा स्वरूपाची असणार आहेत. प्रकल्पाचा अंदाजे खर्च 20,000 कोटी रुपये असणार आहे. प्रकल्प पूर्ण होण्याचे अपेक्षित वर्ष 2029 आहे. भविष्यातील आव्हाने लक्षात घेता पर्यावरण पूरक आणि समृद्ध शहरांची निर्मिती गरजेची आहे. त्यादृष्टीने हे महत्वाचे पाऊल उचलले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.





