MP Breaking News
Wed, Dec 17, 2025

Dadar Kabutar Khana : दादर कबुतरखान्यावरील बंदी हटवली? उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Written by:Smita Gangurde
Published:
मुंबईतील कबुतरखान्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.
Dadar Kabutar Khana : दादर कबुतरखान्यावरील बंदी हटवली? उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

High Court on Dadar Kabutarkhana : कबुतरखान्यावरुन सध्या राज्यभरात गदारोळ सुरू आहे. उच्च न्यायालयाकडून कबुतरखाने बंद करण्याचे आदेश असतानाही जैन समाजातील काही कार्यकर्त्यांनी कबुतरखान्यावरील ताडपत्री हटवली. त्यामुळे मुंबईत कायदा सुव्यवस्थेबाबत संताप व्यक्त करण्यात आला. मुंबईतील कबुतरखान्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सर्वांचं लक्ष या सुनावणीकडे लागलं होतं. दरम्यान उच्च न्यायालयाने परिस्थिती जैसे थे ठेवत कबुतरखान्यावरील बंदी कायम ठेवली आहे.

आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे मुद्दे…

१ मुंबई महानगरपालिकेने कबुतरांना खायला घालायला काही वेळ ठरवून देता येईल का याबाबत विचारणा केली. सकाळी ६ ते ८ या वेळीत कबुतरांना खायला घातलं जर चालेल का, यावर न्यायालयाने स्पष्ट नकार दिला. आणि माणसांच्या आरोग्याचा विचार करा असं सुनावलं.

२ याचिकाकर्त्यांनी कबुतरांना दुसरी एखादी जागा कबुतरांना खाऊ घालण्यासाठी द्यावी अशी विचारणा केली. यावेळी रेसकोर्सची जागा मागण्यात आली. मात्र यासही उच्च न्यायालयाने थेट नकार दिला. उद्या आझाद मैदान आणि शिवाजी पार्कही मागाल असंही ते यावेळी म्हणाले.

३ यापूर्वी झालेल्या सुनावणीमध्येही मुंबई उच्च न्यायालयाने काही गोष्टी स्पष्ट केल्या होत्या. सार्वजनिक आरोग्य महत्त्वाचं असून ज्येष्ठ नागरिक आणि लहानग्यांच्या आरोग्यावर कबुतरांचा परिणाम होत असेल तर त्यांच्याकडे लक्ष देणं आवश्यक असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं होतं.

मराठी एकीकरण कार्यकर्त्यांची धरपकड

जैन समाजाने केलेल्या आंदोलनादरम्यान मुंबई पोलिसांनी नरमाईची भूमिका घेतली होती. आज मात्र मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनात मोठा गोंधळ झाला. पोलिसांनी मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. यामुळे काही वेळासाठी वातावरण गंभीर झालं होतं. कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दुटप्पी कारवाईचा आरोपही केला आहे.