मुंबई – मराठीच्या मुद्द्यावर आणि सत्ता शाबूत राखण्यासाठी मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार हे जवळपास निश्चित मानलं जातंय. अद्याप ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीची अधिकृत घोषणा झालेली नाहीय, मात्र या दोन पक्षांनी किती जागा लढवाव्यात यासाठीचा फॉर्म्युलाही निश्चित झाल्याचं बोललं जातंय. एका वृत्तसंस्थेने थेट जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे.
काय आहे जागावाटपाचा फॉर्म्युला?
ठाकरे शिवसेना आणि मनसे आपापल्या बालेकिल्ल्यात दोन्ही पक्ष समसमान
जागा लढवणार. दादर-माहिम,
लालबाग-परळ-शिवडी,
विक्रोळी, दिंडोशी, घाटकोपर पश्चिम,
दहिसर, भांडुप मध्ये 50:50 फॉर्म्युला असणार
मराठी बहुलभाग वगळता उर्वरित मुंबईत
60:40 या प्रमाणात जागावाटप होणार, अशी चर्चा सध्या संगतेय. ठाकरेंची शिवसेना 60 टक्के
तर मनसे 40 टक्के जागांवर आपले उमेदवार उभे करेल, असं ठरल्याचं सांगण्यात येतंय.

अंतिम निर्णय दिवाळीनंतर
मुंबईसाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं वृत्त खासदार संजय राऊतांनी फेटाळलंय. युतीबाबत अंतिम निर्णय दिवाळीनंतरच होईल असं राऊतांनी म्हटलंय. हिंदुत्वाच्या भूमिकेमुळं राज ठाकरेंची मनसे महाविकास आघाडीत सहभागी होणार नाही हे जवळपास स्पष्ट आहे. अशा परिस्थितीत ठाकरेंची शिवसेना मविआतून बाहेर पडणार असं बोललं जातंय. राज ठाकरे यांच्या मनसेने कायमच मराठी अस्मितेवर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भर दिला आहे. तर महाविकास आघाडी झाल्यापासून उद्धव ठाकरेंनी सर्वसमावेशक भूमिका घेतली आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर मुस्लिमबहुल वॉर्डांमधील बहुतांश जागा ठाकरेंची शिवसेना लढवणार असल्याचे समजतंय. परिणामी मनसेलाही आपल्या मतदारांना न दुखावता मते मिळवता येतील असं बोललं जातंय
ठाकरेच ब्रँड, मनसेचा दावा
भाजपानं वरळीतील विजयी मेळाव्यातून महापालिकेचं रणशिंग फुंकलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बेस्ट निवडणुकीचं उदारहण देत ठाकरे बंधूंचा बँडबाजा वाजवल्याचा दाखला दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपाडेंनी ठाकरे ब्रँडबाबत पोस्ट करत भाजपाला डिवचलंय. ठाकरे हा ब्रँड नाही विचार आहे. अशी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.
विधानसभा निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची कामगिरी निराशाजनक होती. ठाकरेंच्या शिवसेनेला 95 पैकी केवळ 20 जागांवर विजयी मिळाला होता दुसरीकडे, मनसेला एकही जागा जिंकता आलेली नाही त्यामुळे, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत नव्याने सिद्ध करण्यासाठी या दोन्ही पक्षांना एकत्र येणे अपरिहार्य असल्याची चर्चा आहे.











