मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे हा भारतातील पहिला सहा-लेनचा आधुनिक द्रुतगती महामार्ग असून महाराष्ट्राच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीत त्याचे मोठे योगदान आहे. या मार्गामुळे मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांतील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. वाहतुकीची सोय वाढल्याने उद्योग, व्यापार, पर्यटन आणि शिक्षण क्षेत्राला नवी गती मिळाली आहे. तसेच, या महामार्गाने राज्यातील वाहतूक व्यवस्थेत आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू केला आहे.
सुरक्षितता आणि वेग यांचा सुंदर मिलाफ असलेल्या या मार्गामुळे महाराष्ट्रातील आर्थिक केंद्रे अधिक जवळ आली आहेत आणि विकासाचे नवे दार उघडले आहे. अशा परिस्थितीत या महामार्गाचे आगामी काळात विस्तारीकरण होणार असल्याची माहिती समोर येत आहे. हा महामार्ग 10 लेनचा केला जाणार असल्याची माहिती आहे.

एक्स्प्रेस वे आता 10 लेनचा होणार
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मुंबई-पुणे एक्सप्रेसवे प्रकल्पासाठी आधी 8-लेन विस्ताराची योजना होती, मात्र आता ती सुधारित करून 10-लेन करण्यात आली आहे. 2030 पर्यंत मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचे 10 पदरी सुपरहायवेमध्ये रूपांतर करण्याची योजना एमएसआरडीसीने जाहीर केली आहे. वाढती वाहनसंख्या, वाहतूक कोंडी आणि भविष्यातील प्रवासाच्या गरजा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या या महामार्गावर दररोज सुमारे 65,000 वाहने प्रवास करतात, तर शनिवार-रविवारी हा आकडा 1 लाखांच्या वर पोहोचतो.
2030 पर्यंत काम पूर्ण होण्याचा अंदाज
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे प्रकल्पासाठी आधी 8-लेन विस्ताराची योजना होती, मात्र आता ती सुधारित करून 10-लेन करण्यात आली आहे. या बदलामुळे प्रकल्पाच्या खर्चात 1,420 कोटी रुपयांची वाढ होणार आहे, तसेच एकूण बांधकाम खर्च 8,440 कोटी रुपये, तर प्रकल्पाचा एकूण अंदाजे खर्च 14,260 कोटी अपेक्षित आहे. या महामार्गाच्या विस्ताराचे काम 2026 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे आणि ते ते 2029-30 पर्यंत पूर्ण होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मुंबई-पुण्याच्या विकासाला हातभार
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे हा 94.6 किमी लांबीचा महामार्ग नवी मुंबईतील कलंबोळीपासून पुण्याजवळील किवळेपर्यंत पसरलेला आहे. हा महामार्ग 2002 मध्ये सुरू झाला. दरवर्षी या मार्गावरील वाहतुकीत 5 ते 6 वाढ होत आहे. सध्या एक्सप्रेसवेवरील 13 किमी मिसिंग लिंक प्रकल्प सुरू असून यात खंडाळा घाटातील 10-लेन विभागाचाही समावेश आहे. नवीन विस्तार योजना उर्वरित भागासाठी आहे. या विस्तारामुळे दोन्ही शहरांदरम्यान प्रवासाचा वेळ कमी होईल आणि ट्रॅफिक जामच्या समस्येपासून देखील वाहनधारकांची सुटका होईल.











