MP Breaking News
Sat, Dec 20, 2025

मुंबई-पुणे प्रवास आणखी वेगवान होणार, एक्स्प्रेस-वे दहा लेनचा करण्याचा राज्य सरकारचा मानस

Written by:Rohit Shinde
Published:
मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे लवकरच दहा पदरी होण्याची शक्यता आहे. यासाठी 14 हजार कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित प्रस्ताव मंजूरीच्या अधिन आहे.
मुंबई-पुणे प्रवास आणखी वेगवान होणार, एक्स्प्रेस-वे दहा लेनचा करण्याचा राज्य सरकारचा मानस

मुंबई-पुणे या दोन शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. त्यानुसार, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवास आणखी वेगवान आणि सुकर होणार आहे. सध्या सहा पदरी असलेला हा महामार्ग आता थेट दहा पदरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून तयार करण्यात आलेल्या नव्या प्रस्तावानुसार, या प्रकल्पासाठी अंदाजे 14 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रस्ताव येत्या दहा दिवसांत राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. राज्य सरकारने या प्रस्तावाला हिरवा कंदिल दाखवल्यास या महामार्गाचे काम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

जवळपास 1 लाख वाहनांची ये-जा

याआधी एमएसआरडीसीने महामार्गाचे आठ पदरीकरण करण्याचा प्रस्ताव फेब्रुवारी 2024 मध्ये सादर केला होता, मात्र आता वाहतूक वाढीचा अंदाज घेत, दोन-दोन मार्गिका वाढवून दहा पदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना दिली. सध्या या महामार्गावरून दररोज सुमारे 65 हजार वाहने धावतात, तर गर्दीच्या वेळेत ही संख्या एक लाखांवर पोहोचते. वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता, सध्या अस्तित्वात असलेला सहा पदरी रस्ता अपुरा पडू लागला आहे.अ

अधिकच्या भूसंपादनाची गरज

एमएसआरडीसीने स्पष्ट केले आहे की महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी दोन मार्गिका वाढविण्यासाठी आवश्यक ती जागा उपलब्ध आहे. मात्र काही ठिकाणी विशेषतः बोगद्यांच्या परिसरात थोडेफार भूसंपादन करावे लागेल. प्रकल्पाचा खर्च भागवण्यासाठी दोन पर्याय सुचविण्यात आले आहेत. एकतर महामार्गावरील टोल वसुलीची कालमर्यादा वाढवणे, किंवा राज्य सरकारने अर्थसंकल्पीय तरतुदीतून निधी उपलब्ध करून देणे. या दोन्ही पर्यायांपैकी सरकार ज्या पर्यायाची निवड करेल, त्यानुसार प्रकल्पाला गती देण्यात येईल. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाची एकूण लांबी 94.5 किमी आहे आणि तो 2002 साली पूर्णत: वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. या महामार्गामुळे मुंबई ते पुणे अंतर फक्त अडीच तासांत पार करणे शक्य झाले. आता दहा पदरीकरणानंतर प्रवास आणखी गतीमान आणि सुलभ होण्याची शक्यता आहे.
आता एमएसआरडीसीने प्रस्तावित केलेला 14 हजार कोटींच्या निधीला मंजूरी देते का यावर महामार्गाच्या रूंदीकरणाचे भविष्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे आता राज्य सरकार या प्रस्तावाचं नेमकं काय करतं ते पाहणं महत्वाचा ठरणार आहे. या महामार्गाचे रूंदीकरण झाल्यास वाहनधारकांना याचा मोठा फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे.