मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा, ७ ते ९ ऑक्‍टोबर दरम्यान पाणी कपात लागू, कारण काय?

संबंधित परिसरातील नागरिकांनी उपरोक्त तीन दिवसांच्‍या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करावा. पाणी कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. 

Water Supply – मुंबईकरांच्या पाण्याबाबत एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. यावर्षी पाऊस समाधानकारक झाला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारी सातही धरणे तुंडूब भरली आहेत. तरी सुद्धा मुंबईतील काही भागात ७ ते ९ ऑक्‍टोबर दरम्यान पालिकेकडून पाणी कपात लागू करण्यात आलेली आहे. मंगळवार दिनांक ७ ऑक्‍टोबर ते गुरूवार दिनांक ०९ ऑक्‍टोबर २०२५ असे तीन दिवस १० टक्के पाणी कपात केली जाणार आहे. त्यामुळं नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे बृहन्‍मुंबई महानगरपालिकेनं आवाहन केले आहे.

कोणत्या कारणामुळं पाणी कपात लागू?

दरम्यान, पिसे, पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत मीटर अद्ययावतीकरण कामामुळे शहर व पूर्व उपनगरातील काही विभागांमधील पाणीपुरवठ्यात १० टक्‍के कपात करण्यात आले आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे, पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील १०० किलोव्‍हॅट विद्युत केंद्रामधील विद्युत मीटर अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. नियोजनानुसार, मीटर जोडणीचे काम मंगळवार, दिनांक ०७ ऑक्‍टोबर, बुधवार दिनांक ०८ ऑक्‍टोबर आणि गुरूवार दिनांक ०९ ऑक्‍टोबर २०२५ रोजी दररोज दुपारी १२.३० ते ०३.०० वाजेपर्यंत म्‍हणजेच अडीच तास केले जाणार आहे. त्यामुळे शहर विभाग आणि पूर्व उपनगरांतील बहुतांश विभागांचा पाणीपुरवठा सलग तीन दिवस पाणी कपात केली जाणार आहे.

कोणत्या विभागात पाणी कपात?

मुंबई शहर विभागातील ए, बी, ई, एफ दक्षिण आणि एफ उत्‍तर विभागात संपूर्ण कार्यक्षेत्रात तसेच, पूर्व उपनगरांतील एम पूर्व आणि एम पश्चिम विभागात संपूर्ण परिसरात १० टक्के पाणी कपात लागू केली जाणार आहे. पूर्व उपनगरांतील एल विभाग (कुर्ला पूर्व),  एन विभागात विक्रोळी, घाटकोपर व घाटकोपर पूर्व, एस विभागात भांडूप, नाहूर, कांजूरमार्ग आणि विक्रोळी पूर्व आणि टी विभागाात मुलुंड पूर्व आणि पश्चिम क्षेत्रात १० टक्‍के पाणी कपात लागू राहणार आहे.

शहर विभाग

१. ए विभाग – संपूर्ण विभाग
२. बी विभाग – संपूर्ण विभाग
३. ई विभाग – संपूर्ण विभाग
४. एफ दक्षिण विभाग – संपूर्ण विभाग
५. एफ उत्तर विभाग – संपूर्ण विभाग

पूर्व उपनगरे

१. एल विभाग- कुर्ला पूर्व क्षेत्र
२. एम पूर्व विभाग – संपूर्ण विभाग
३. एम पश्चिम विभाग – संपूर्ण विभाग
४. एन विभाग – विक्रोळी, घाटकोपर पूर्व, घाटकोपर
५. एस विभाग – भांडूप, नाहूर, कांजूरमार्ग आणि विक्रोळी पूर्व क्षेत्र
६. टी विभाग – मुलुंड पूर्व आणि पश्चिम क्षेत्र

About Author

Astha Sutar

Other Latest News