भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीच्या आधारे, राज्यात पुढील काही दिवसात 17 ते 21 ऑगस्ट 2025 दरम्यान अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे. 16 ते 21 ऑगस्ट 2025 दरम्यान कोकण व मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टीसह अत्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर मराठवाडामध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. अशा या तुफान पावसाच्या काळात मुंबईकरांची मात्र वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.
तुलसी तलाव ओव्हरफ्लो; चिंता मिटली!
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील तुळशी तलाव शनिवारी सायंकाळी 6.45 वाजता ओसंडून वाहू लागला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे. तुळशी तलावाची कमाल पाणी साठवण क्षमता 804.60 कोटी लिटर (8046 दशलक्ष लिटर) इतकी आहे. हा तलाव संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यात स्थित असून महानगरपालिकेच्या भांडूप जलशुद्धीकरण संकुलापासून जवळच्या परिसरात आहे. 804 कोटी लिटर इतकी कमाल उपयुक्त जलधारण क्षमता असणारा हा तलाव गेल्यावर्षी (2024) 20 जुलै रोजी भरुन वाहू लागला होता.
कोकण-मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम आज संपूर्ण कोकणात दिसण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवस म्हणजेच 21 ऑगस्ट 2025 पर्यंत महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील लगतच्या घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विजा आणि गडगडाटासह अधूनमधून 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
आज मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता आहे. नागरिकांना अत्यंत आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई शहर आणि उपनगरातही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो, काही ठिकाणी तर अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.





