दिवाळीच्या मंगलमय वातावरणात मुंबईत सध्या फटाक्यांची आतषबाजी सुरू आहे. अशा परिस्थितीत मुंबई शहर, उपनगरे आणि कल्याण- डोंबिवली, ठाणे परिसरात हवेची गुणवत्ता चांगलीच ढासळली आहे. मुंबई शहरातील वाढते हवा प्रदूषण हे आज गंभीर चिंतेचे कारण बनले आहे. दररोज वाढणारी वाहने, बांधकामांची धुळ, औद्योगिक धूर, आणि कचरा जाळण्याच्या घटना यामुळे शहरातील हवेची गुणवत्ता झपाट्याने खालावत आहे. या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर थेट परिणाम होत असून श्वसनाचे आजार, दमा, खोकला, डोळ्यांची जळजळ आणि त्वचेचे विकार वाढताना दिसत आहेत. अशा या संपूर्ण परिस्थितीमध्ये आता हिवाळा सुरू होत आहे. त्यामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळताना दिसत आहे. याचा गंभीर परिणाम खरंतर नागरिकांच्या आरोग्यावर होणार आहे.
जगातील २ रे सर्वाधिक प्रदूषित शहर मुंबई
जागतिक रिपोर्टनुसार, जगातील सर्वात प्रदूषण शहरांमध्ये सहाव्या क्रमांकावर असलेली मुंबई थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. या यादीत दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. तर कोलकात्ता तिसऱ्या क्रमांकावर आहे. हवा प्रदूषणाचा स्तर 200 च्या वर पोहोचला आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये वातावरणाचा स्तर 221 AQI पर्यंत पोहोचला आहे. 20 ऑक्टोबरला येथे हवेची गुणवत्ता गंभीर स्तरापर्यंत पोहोचली होती. सर्वात भयंकर अवस्था बीकेसीची होती. येथील हवेची गुणवत्ता AQI 300 च्या पार केली होती.

राजधानी दिल्लीतही हवा प्रदूषण वाढले !
दिल्लीत मंगळवारी, २१ ऑक्टोबर रोजी सकाळी विषारी हवा पाहायला मिळाली. सोमवारी सायंकाळी दिल्लीत ३८ निरीक्षण केंद्रांवरील ३४ ठिकाणांवरील प्रदूषणाचा स्तर रेड झोनमध्ये नोंदविण्यात आला होता. रेड झोन म्हणजे अत्यंत खराब ते गंभीर हवेची गुणवत्ता. सोमवार-मंगळवारदरम्यान रात्री दिल्लीत प्रदूषणाचा स्तर वाढला होता आणि AQI ५३१ पर्यंत दाखल करण्यात आला आहे. दिल्लीतील हवा आधीच विषारी झाली आहे. दिवाळीत फटाक्यांमुळे हवेची गुणवत्ता अधिक ढासळली आहे.
प्रदूषित हवा; आरोग्याची काळजी कशी घ्यावी?
प्रदूषित हवेत आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. हवेत धुर, धुळ किंवा रासायनिक प्रदूषण जास्त असल्यास घरात राहणे, खिडक्या व दरवाजे बंद ठेवणे फायदेशीर ठरते. शक्य असल्यास एन-95 मास्क वापरणे हवेचे प्रदूषण श्वसनात येण्यापासून प्रतिबंध करते. दिवसभरात पाणी अधिक प्यावे आणि संतुलित आहार घ्यावा, ज्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. श्वसनाची समस्या असलेल्या लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. घरात हवा शुद्ध करणारी उपकरणे किंवा झाडे लावणे उपयुक्त ठरते. बाहेर जास्त वेळ घालवणे टाळा आणि नियमित व्यायाम व योग करून शरीर व मन दोन्ही निरोगी ठेवा.











