संपूर्ण राज्यात साताऱ्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येनं खळबळ उडाली आहे, आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी या महिला डॉक्टरच्या मृत्यूची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. शिवाय आमदार सुरेश धस यांनी देखील घातपाताचा संशय बोलून दाखवला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळताना दिसत आहे. या प्रकरणात निलंबित पीएसआय गोपाळ बदने आणि मित्र प्रशांत बनकर या पलीकडे कुणी तिसऱ्या व्यक्तीचा संबंध आहे का, असा संशय देखील आता यामध्ये व्यक्त केला जात आहे.
डॉक्टर तरूणीची आत्महत्या की हत्या?
“महिला डॉक्टरच्या तळहातावर सात ओळींचा एक संदेश होता. या संदेशातील हस्ताक्षरावरही त्यांनी शंका उपस्थित केली आहे. हातावरील अक्षरात जरा शंका वाटते. त्यांनी आत्महत्या केली की त्यांचा खून करण्यात आला याची पोलिसांनी सखोल चौकशी करुन दोषींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी” अशी मागणी माजी भीमराव धोंडे यांनी केली आहे. दुसरीकडे आमदार सुरेश धस यांनी देखील इतकी धैर्वयान मुलगी आत्महत्या करेल, हे पटत नाही. असा संशय बोलून दाखविला आहे. त्यामुळे पोलिस आता या प्रकरणाकडे एक हत्या म्हणून पाहणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

थेट राहुल गांधींनाही हत्येचा संशय !
फटलण डॉक्टर आत्महत्या आणि बलात्कार प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधींकडून मोठा आरोप करण्यात आला आहे. महिला डॉक्टरांनी आत्महत्या केली नाही, तर ही हत्याच आहे, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी केला आहे. त्यांनी भाजपवरही गंभीर आरोप केला आहे. महिला डॉक्टरने अलिशान हॉटेलमध्ये आत्महत्या केली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांची नावे होती. या प्रकरणात विरोधकांकडून भाजपच्या नेत्यावरही गंभीर आरोप केले.
गोपाळ बदनेला कोर्टाचा मोठा दणका
फलटणच्या डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी गोपाल बदने याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सह दिवाणी न्यायाधीश ए. एस. साटोटे कोर्टने हे कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात पोलिसांनी 7 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र आरोपीचे वकील अॅड. राहुल धायगुडे यांनी आरोपीचा यात कोणताही दोष नसून त्याला गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आरोपी बदने याला 1 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी असा युक्तिवाद केला.











