शालेय सहली विद्यार्थ्यांच्या जीवनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. सहलींमुळे विद्यार्थ्यांचा दृष्टीकोन विस्तारतो, शिकण्याची संधी मिळते आणि पुस्तकातील ज्ञान प्रत्यक्ष अनुभवता येते. सहकाऱ्यांशी मैत्री, शिस्त, जबाबदारी आणि समूहभावना विकसित होते.  या शैक्षणिक सहली समुद्र किनारे, किल्ले अशा ठिकाणी जात असतात. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड-जंजिरा या भागात मोठ्या प्रमाणात सहली येत असतात. त्या अनुषंगाने आता काही नवे नियम जाहीर करण्यात आले आहेत. कारण, अशा ठिकाणी सहलींदरम्यान बऱ्याचदा विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका देखील संभवतो.

शैक्षणिक सहलींसाठी नवे नियम लागू

सहलीच्या आठवणी विद्यार्थ्यांच्या संपूर्ण आयुष्यभर लक्षात राहतात. परंतु या सहलीदरम्यान शिक्षकांसोबतच विद्यार्थ्यांनीही सुरक्षितता, शिस्त आणि नियमांचे पालन करणे आवश्यक असते. अनेक सहली रायगडमधील समुद्र किणाऱ्यांवर येतात. त्यामुळे येथे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यातील अलिबागसारख्या अनेक समुद्र किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात शैक्षणिक सहली येत आहेत. या विद्यार्थांना समुद्रात उतरण्यापूर्वी कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे याबाबतची नियमावली स्थानिक प्रशासनाकडून जारी करण्यात आली आहे. तसेच त्यासंदर्भातील सूचना फलक देखील समुद्रकिनाऱ्यावर लावण्यात येणार आहेत.

रायगडच्या किनाऱ्यांवर ‘हे’ नियम पाळा !

समुद्रकिनारी सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना पाण्यात उतरण्यास मनाई असणार आहे. अनेकदा समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने विद्यार्थी बुडण्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या आठवड्यातच काशिद बीचवर आलेल्या खासगी क्लासच्या सहलीतीलएक शिक्षक आणि एक विद्यार्थी बुडाल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर सहलीसोबत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नियम लागू करण्यात आले आहेत. पुणे येथील इनामदार महाविद्यालयाचे 13 विद्यार्थी काही दिवसांपूर्वी मुरूडच्या समुद्रात बुडाल्याची मोठी दुर्घटना घडली होती. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये यासाठी स्थानक प्रशासनाने कडक नियमावली जारी केली आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांनी आओमि शिक्षकांनी या नियमांचे पालन करावे असे आवाहन राज्‍याच्या शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

समुद्र किणाऱ्यावर शैक्षणिक सहलीसाठी येणाऱ्या शिक्षकांसाठी सूचना जारी करण्यात आली आहे. सहलीचे नियोजन करताना विद्यार्थ्यांची संख्या, वयोगट, मार्ग, निवास, भोजन आणि आपत्कालीन संपर्कव्यवस्था यासह वैद्यकीय सुविधांची काळजीपूर्वक आखणी करावी. विद्यार्थ्यांसोबत येणाऱ्या प्रत्येक शिक्षक आणि मार्गदर्शकांना जबाबदाऱ्या वाटून द्याव्यात. सर्वांनी मिळून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे अशा सूचना जारी करण्यात आल्या आहेत.