‘ऑक्टोबर हीट’ म्हणजे ऑक्टोबर महिन्यात जाणवणारी असामान्य उष्णता. साधारणतः पावसाळ्यानंतर, म्हणजे सप्टेंबरच्या अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला, हवा कोरडी होते आणि वातावरणात आर्द्रतेचं प्रमाण कमी होतं. या काळात तापमान अचानक वाढतं, ज्यामुळे दिवसाचे वातावरण उकाड्याचे व दमट होते यालाच “ऑक्टोबर हीट” म्हणतात. सध्यस्थितील राज्याच्या बऱ्याच भागात ऑक्टोबर हीटचा प्रभाव जाणवतोय, त्यामध्ये मुंबईसह कोकणात परिस्थिती अधिक गंभीर स्थितीला आहे.
मुंबईसह कोकणात ऑक्टोबर हीटचा प्रभाव
गेल्या काही दिवसांपासून राज्यात हवामानात मोठ्या प्रमाणात बदल दिसून येत आहेत. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत झालेल्या मुसळधार पावसानंतर आता ऑक्टोबर महिन्यात वातावरण पूर्णपणे बदलले आहे. पावसाचा जोर ओसरल्याने आणि सूर्यकिरणांचा तडाखा वाढल्याने कोकण किनारपट्टीवर उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सध्या ‘ऑक्टोबर हीट’चा काळ सुरू असून, दुपारच्या सुमारास तापमान झपाट्याने वाढताना दिसत आहे.

मुंबईत आज आकाश स्वच्छ आणि ऊन प्रखर आहे. सकाळपासूनच सूर्य तळपत असून दुपारपर्यंत उकाडा अधिक जाणवणार आहे. दमट वातावरणामुळे घामाघूम परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे रस्ते कोरडे झाले आहेत आणि नागरिकांना आज उष्णतेचा त्रास जाणवेल.
पालघर जिल्ह्यात आजही कोरडे हवामान राहील. सकाळपासूनच उष्णता जाणवत असून सायंकाळपर्यंत उकाडा वाढेल. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये आज आंशिक ढगाळ वातावरण राहील, पण पाऊस होणार नाही. गेल्या आठवड्यापासून पाऊस थांबल्याने वातावरण कोरडे झाले आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकीकडे ऑक्टोबर हीटचा प्रभाव आणि एकीकडे ढगांची गर्दी अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे.