मुंबई- ओला, उबेरसारख्या अॅपवर चालणाऱ्या टॅक्सी सेवांचं भाडं अखेर परिवहन विभागाकडून निश्चित करण्यात आलं आहे. या नव्या दरांनुसार ओला आणि उबेरसारख्या सेवा आता यापुढे दर आकारणार आहेत. या नव्या दरांचा फटका ग्राहकांना बसण्याची शक्यता आहे. हे नवे दर 18 सप्टेंबरपासून लागू झाले आहेत.
ओला उबेरचे दर आता प्रति किलोमीटर 22.72 पैसे असे निश्चित करण्यात आले आहेत. मागणी असेल त्या कालावधीत भाडं दीडपट जास्त होऊ शकतं. म्हणजे मागणीच्या काळात 34 रुपये प्रति किमी दर आकारणी करण्यात येईल. तर मागणी नसलेल्या काळात हे दर 17 रुपये प्रति किमी असू शकतील.

काय आहेत ओला, उबेरचे नवे दर ?
1. अॅप आधारित टॅक्सी सेवेत मागणी नसताना आणि मागणी असताना आणि मूळ दर असा तीन पद्धतीने आकारले जातात.
2. मागणी नसलेल्या काळात सध्या 10 रुपये प्रति किमी दर ओला-उबेर चालकांना मिळत होता. त्यातील काही पैसे हे कंपन्यांना जात होते. त्यामुळे दर निश्चितीची मागणी करण्यात आली होती.
3. आता प्रति किमी 22.72 पैसे असे दर परिवहन विभागानं निश्चित केले आहेत.
4. मागणी नसलेल्या काळात 17 रुपये दर आकारणी होऊ शकते. मूळ असलेल्या दरांपेक्षा हे दर 25 टक्क्यांनी कमी असतील.
5. मागणी असलेल्या काळात हे दर सद्यस्थितीत 46 ते 48 रुपये प्रति किलोमीटर असे आकारण्यात येत होते. मात्र आता केवळ दीडपटच वाढ ओला उबेर चालकांना मिळणार आहे.
6. मागणीच्या काळात दरवाढ झाल्यास दीडपट म्हणजे 34 रुपये दर आकारणी करण्यात येईल.
7. प्रत्येक फेरीचे 80 टक्के पैसे हे टॅक्सी चालकाला मिळणार आहेत. यापूर्वी ही कपात जास्त होती.
8. 18 सप्टेंबरपासून हे नवे दर लागू.
मुंबई महानगर क्षेत्रात हे नवे दर आकारले जातील असं परिपत्रक परिवहन विभागाच्या वतीनं काढण्यात आलं आहे.
वाहनचालकांचं आंदोलन, प्रवाशांना भुर्दंड
ओला-उबेरसारख्या अॅपआधारित सेवेचा उपयोग मुंबई आणि उपनगरात हजारो प्रवाशांककडून घेण्यात येतो. धोरण लागू होत नसल्यानं टॅक्सी चालकांकडून वारंवार आंदोलन करण्यात येत होतं. संप झाल्यास त्याचा फटका हजारो प्रवाशांना बसण्याची शक्यता होती. त्यामुळे आता परिवहन विभागानं आता याबाबतचा अंतिम निर्णय घेतलेला आहे











