राज्यात सरासरीच्या 102 टक्के पाऊस; बचाव पथकाच्या 17 तुकड्या तैनात, सर्व मंत्री पूरग्रस्त भागात जाणार

Astha Sutar

State Government : मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेतीचं मोठं नुकसान झालं असून, अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभं राहिलं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी पूरग्रस्त भागातील बचावकार्य, शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत आणि पुढील नियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली.

अतिवृष्टीमुळे पूरस्थिती गंभीर

धाराशीवमध्ये हेलिकॉप्टरच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे, तर अतिरिक्त हेलिकॉप्टर उपलब्ध करून देण्यासाठी सैन्यदलांशी चर्चा सुरू आहे. आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला असून, 10 जण जखमी झाले आहेत. पूरग्रस्त भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून, त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था सरकारतर्फे करण्यात आली आहे”. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “राज्यात आतापर्यंत 975.5 मिमी पाऊस पडला आहे, जो सरासरीच्या 102 टक्के इतका आहे. बीड, धाराशीव, परभणी आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती गंभीर झाली आहे.

शेतकऱ्यांना तातडीनं मदत करणार

“शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी सरकारने तातडीने पावलं उचलली आहेत. आतापर्यंत 31 लाख 64 हजार शेतकऱ्यांना 2 हजार 215 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. यापैकी 1 हजार 829 कोटी रुपये जिल्ह्यांमध्ये जमा झाले असून, पुढील 8 ते 10 दिवसांत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. पंचनामे पूर्ण होताच तातडीने मदत वितरित करण्याचं धोरण अवलंबण्यात आलं आहे. जीवितहानी आणि वित्तहानीसाठी स्थानिक पातळीवर तात्काळ मदत देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

ताज्या बातम्या