Onion Price: महाराष्ट्रातील कांद्याच्या दराबाबत मोठी अपडेट समोर; कुठे अन् किती मिळतोय दर ?

अलीकडच्या काळात बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढताना दिसत आहे. त्यामुळे दरांमध्ये सातत्याने घसरण सुरू आहे.

महाराष्ट्रासह देशभरातील कांदा उत्पादकांच्या अडचणी गत दोन वर्षांपासून कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाहीत. कारण, परदेशातील निर्यातीवर येणारे निर्बंध, पावसामुळे कांद्याची होणारी हानी या संपूर्ण परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे अलीकडच्या काळात बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढताना दिसत आहे. त्यामुळे दरांमध्ये सातत्याने घसरण सुरू आहे.

कांद्याची उच्चांकी आवक; दरात घसरण

राज्याच्या मार्केटमध्ये 1 लाख 54 हजार 182 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 49 हजार 165 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 309 ते 1855 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच अहिल्यानगर मार्केटमध्ये आवक झालेल्या 6760 क्विंटल कांद्यास प्रतीनुसार 200 ते 3111 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
कांद्याच्या दरामध्ये घसरण कायम राहणार?

देशभरात कांद्याच्या दरात घसरण ही सध्याची समस्या आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे बाजारात कांद्याची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता. आवक वाढल्यामुळे भाव घसरले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. कांद्याच्या या घसरणीमुळे किरकोळ विक्रेते आणि ग्राहकांनाही फायदा होतो, कारण कमी किमतीत कांदा मिळतो. मात्र शेतकऱ्यांसाठी ही चिंता वाढवणारी बाब आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कांद्याची मागणी लक्षणीयरीत्या घटली आहे. बांगलादेश, श्रीलंका आणि इतर शेजारी देशांनी स्थानिक उत्पादन वाढवले आहे. त्यामुळे भारतातून निर्यातीला वाव उरलेला नाही. परिणामी, देशांतर्गत बाजारात कांद्याचे दर वाढण्याची शक्यता अत्यल्प आहे. उशिराने लागवड झाल्याने खरीप कांद्याचे पीक नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यानंतर बाजारात येण्याची शक्यता आहे.

सध्या कर्नाटकातील कांद्याची आवक सुरू असून ती नोव्हेंबर अखेरपर्यंत सुरू राहील. या काळात जुना रब्बी कांदा आणि नवीन खरीप कांदा दोन्ही बाजारात येणार असल्याने, पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्यामुळे दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.

राजस्थान, गुजरातचा कांदा डोकेदुखी वाढवणार !

लवकरच राजस्थान आणि गुजरातमधूनही नवीन कांद्याचा पुरवठा वाढेल. या सर्व घटकांमुळे बाजारात कांद्याचा बंपर स्टॉक उपलब्ध होणार असून, त्यामुळे भाव आणखी कोसळू शकतात, असा इशारा कांदा निर्यातदारांनी दिला आहे. त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अशी बातमी समोर येत आहे. परिणामी आगामी काही दिवसांत राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News