भारतातील प्रामुख्याने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काहीशी दिलासादायक अशी एक बातमी नुकतीच समोर आली आहे. कारण, बांगलादेशमध्ये कांद्याच्या आयातील परवानगी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरू शकणारा निर्णय नुकताच समोर आला असला, तरी प्रत्यक्ष परिस्थिती पाहता शेतकऱ्यांच्या अडचणी पूर्णपणे सुटल्या आहेत असे म्हणता येणार नाही. मात्र हा निर्णय उशिरा आल्याची खंत शेतकरी संघटनांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

बांगलादेश आयात करणार; कांद्याचे दर वाढणार ?
आज 7 डिसेंबरपासून दररोज 30 टन क्षमतेचे 50 आयपी (इम्पोर्ट परमिट) जारी केले जाणार असून यामुळे एका दिवसाला सुमारे 15 हजार क्विंटल कांदा बांगलादेशला निर्यात होणार आहे. या परवानग्या यापूर्वी अर्ज केलेल्या आयातदारांनाच देण्यात येणार आहेत. कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष भारत दिघोळे यांच्या मते, या निर्णयामुळे कांद्याला मागणी वाढेल आणि बाजारात काही प्रमाणात दरवाढ दिसून येईल.
शेतकऱ्यांच्या दृष्टीने पाहता हा दिलासा अपुरा असल्याचे चित्र आहे. उन्हाळी कांद्याचे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर राज्यातील काही भागांत पूरस्थिती निर्माण झाल्याने शेतजमीन आणि उभ्या पिकाचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी पिके वाहून गेली, तर काही भागात जमिनीही निकामी झाल्या. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च प्रचंड वाढलेला असताना सध्या बाजारात कांद्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. शिवाय बांगलादेशने हा निर्णय उशिरा घेतल्याने हा तितका फायदेशीर ठरणार नाही.
महाराष्ट्रात कांद्याचे दर कमी; नेमकी कारण काय ?
देशभरात कांद्याच्या दरात घसरण ही सध्याची समस्या आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे बाजारात कांद्याची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता. आवक वाढल्यामुळे भाव घसरले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. कांद्याच्या या घसरणीमुळे किरकोळ विक्रेते आणि ग्राहकांनाही फायदा होतो, कारण कमी किमतीत कांदा मिळतो. मात्र शेतकऱ्यांसाठी ही चिंता वाढवणारी बाब आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कांद्याची मागणी लक्षणीयरीत्या घटली आहे. बांगलादेश, श्रीलंका आणि इतर शेजारी देशांनी स्थानिक उत्पादन वाढवले आहे. त्यामुळे भारतातून निर्यातीला वाव उरलेला नाही. परिणामी, देशांतर्गत बाजारात कांद्याचे दर वाढण्याची शक्यता अत्यल्प आहे. उशिराने लागवड झाल्याने खरीप कांद्याचे पीक नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यानंतर बाजारात येण्याची शक्यता आहे.
सध्या कर्नाटकातील कांद्याची आवक सुरू असून ती नोव्हेंबर अखेरपर्यंत सुरू राहील. या काळात जुना रब्बी कांदा आणि नवीन खरीप कांदा दोन्ही बाजारात येणार असल्याने, पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्यामुळे दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.











